गडचिरोली
ashok uike भाजपाच्या संघटनात्मक बैठका व विविध शासकीय उपक्रमांच्या निमित्ताने गडचिरोली दौर्यावर आलेले राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी पोटेगाव बायपास परिसरातील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहाला अचानक भेट देत आढावा घेतला. यावेळी त्यांनी वसतिगृहातील सोयी-सुविधांची पाहणी करत विद्यार्थ्यांशी आपुलकीने आणि हसतखेळत संवाद साधला.
संवादादरम्यान मंत्री डॉ. उईके यांनी वसतिगृहातील पिण्याचे पाणी, स्वच्छता, भोजन व्यवस्था, शैक्षणिक सोयी-सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अडीअडचणींची सविस्तर माहिती घेतली. विद्यार्थ्यांना धीर देत आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवत ते म्हणाले, ‘मीसुद्धा तुमच्यासारखाच वसतिगृहात राहून शिक्षण घेतले आहे आणि आज इथपर्यंत पोहोचलो आहे. मी तुमचाच आदिवासी मंत्री आहे. तुम्हाला येणार्या कोणत्याही समस्या बिनधास्तपणे मांडा, मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. येत्या 15 दिवसांत मी पुन्हा तुमच्या भेटीला येईन, असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
याप्रसंगी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी व कर्मचारी तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.