संतप्त नागरिकांचा रात्रभर ठिय्या
गोंदिया,
truck runs over young man गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावरील नागरा येथे भरधाव कंटेनर ट्रकच्या धडकेत एका ३५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी ४ ऑक्टोबर रोजी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली. लोकेश बघेले (३५) रा. नागरा ता. गोंदिया असे त्या मृत युवकाचे नाव आहे. या घटनेनंतर महामार्गाचे बांधकाम सुरू असतानाही वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात नसल्याने वारंवार अपघात होत असल्याचा आरोप करीत संतप्त नागरिकांनी महामार्गावर घटनास्थळीच रात्रभर ठिय्या आंदोलन केले. बांधकाम कंपनीचे अधिकारी आणि संबंधित कंटेनर मालक येऊन मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर पहाटे आंदोलन मागे घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडणाऱ्या गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गाचे सध्या बांधकाम सुरू आहे. मात्र, बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येत नसल्याने या मार्गावर अपघातांचे सत्र सुरू असल्याचा आरोप नागरा येथील नागरिकांनी केला. विशेष म्हणजे, यापूर्वी झालेल्या अपघातांमध्ये सहा जणांचा बळी गेल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यातच रविवारी रात्री लोकेश बघेले यांचा अपघाती मृत्यू झाल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला. अपघाताची माहिती मिळताच नागरा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महामार्गावर ठिय्या मांडत बांधकाम कंपनीच्या कारभाराविरोधात रोष व्यक्त केला. महामार्गाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी यावे, तसेच अपघातास कारणीभूत ठरलेल्या कंटेनरच्या मालकाने घटनास्थळी येऊन मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांनी करत नागरिकांनी रात्रभर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे महामार्गावरील परिस्थिती गंभीर बनली होती. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांशी चर्चा करून मध्यस्थी केली. त्यानंतर पहाटे नागरिकांनी मृतदेह पोलिसांच्या ताब्यात दिला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत लोकेश बघेले यांच्या पश्चात दोन मुले आहेत. घरात कमावणारे ते एकटेच असताना त्यांच्या अशा अपघाती मृत्यूने बघेले कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. या घटनेने नागरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची नोंद गोंदिया ग्रामीण पोलिसांनी केली आहे.
सुरक्षेअभावी अपघातांची मालिका
महामार्गाचे बांधकाम सुरू असताना सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यापूर्वी सहा जणांचा बळी गेल्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झाली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आता तरी बांधकाम कंपनीने अपघात टाळण्यासाठी ठोस सुरक्षाव्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरत आहे.