'द न्यूयॉर्क टाइम्स' वृत्तपत्रात तुकाराम मुंढे यांचा धमाका..

‘रॉकस्टार’ असा उल्लेख

    दिनांक :05-Oct-2026
Total Views |
न्यूयॉर्क
tukaram mundhe  अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून आपल्या धडाकेबाज कारवाईमुळे चर्चेत असलेले तुकाराम मुंढे आता देशाच्या सीमाही ओलांडून चर्चेत आले आहेत. महाराष्ट्रातील अन्नपदार्थांमधील भेसळ, अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात त्यांनी सुरू केलेल्या कारवाईची दखल अमेरिकेतील आघाडीचे वर्तमानपत्र ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने घेतली आहे. वृत्तपत्राच्या फ्रंट पेजवर मुंढे यांना स्थान देताना त्यांचा उल्लेख ‘रॉकस्टार’ असा करण्यात आला आहे.
 

tukaram mundhe  
आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुंढे यांच्या नेतृत्वाखाली FDAने मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील विविध शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत अन्नपदार्थ विक्रेते, हॉटेल्स, रेस्तराँ आणि खाद्यपदार्थांच्या ठिकाणी तपासणी आणि कारवाईचा धडाका सुरू केला. अचानक करण्यात येणाऱ्या पाहणीदरम्यान अस्वच्छता, अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन किंवा भेसळ आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जात आहे. काही प्रकरणांत परवाने निलंबित करण्याची कारवाईही करण्यात आली आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये मुंढे यांच्या कारवाईची चांगलीच धास्ती निर्माण झाली असून अनेकांनी आपल्या आस्थापनांमधील स्वच्छता आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
 
 
 अनपेक्षितपणे सेलिब्रिटी
मुंढे यांच्या या कामगिरीचीच दखल ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने घेतली आहे. भारतातील एका अन्नसुरक्षा अधिकाऱ्याने आपल्या कारवाईमुळे ‘रॉकस्टार’ची लोकप्रियता मिळवल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. मुंबईतील विविध किचन्सवर करण्यात आलेल्या त्यांच्या छाप्यांमुळे ते अनपेक्षितपणे सेलिब्रिटी ठरले असून, या कारवायांमुळे भारतातील खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत मोठी चर्चा सुरू झाल्याचेही वृत्तात म्हटले आहे.
मुंबईतील प्रसिद्ध  tukaram mundhe  ऑलिम्पिया कॉफी हाऊसवरील कारवाईचाही ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने विशेष उल्लेख केला आहे. गेल्या महिन्यात FDAच्या पथकाने ऑलिम्पिया कॉफी हाऊसची तपासणी केली होती. या कारवाईदरम्यान आरोग्य आणि अन्नसुरक्षेशी संबंधित अनेक गैरप्रकार आढळून आल्यानंतर जवळपास शंभर वर्षांचा इतिहास असलेल्या या आस्थापनाला बंद करण्याचे आदेश देण्यात आले. मुंढे यांच्या कारकिर्दीतील ही एक हाय प्रोफाईल कारवाई असल्याचेही वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
स्वच्छतेचे नियम आणि अन्नसुरक्षेच्या निकषांचे पालन न करणाऱ्या किचन्सविरोधात मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कारवायांमुळे भारतीय ग्राहकांच्या अपेक्षांना प्रतिसाद मिळत असल्याचेही ‘द न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तात म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात FDAच्या कारवाईमुळे निर्माण झालेली चर्चा आता देशाबाहेरही पोहोचली असून, तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीची आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली जात असल्याचे चित्र आहे.