वॉशिंग्टन
bombers इराणवरील हल्ल्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंग्लंडमधील ‘आरएएफ फेअरफोर्ड’ या लष्करी हवाई तळावर तैनात असलेली बॉम्बर विमाने अमेरिकेने माघारी बोलावली आहेत. या तळावर संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा तपास सुरू झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पेंटागॉनच्या एका अधिकाऱ्याने रविवारी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. संवेदनशील लष्करी हालचालींबाबत सार्वजनिकपणे माहिती देण्यास अधिकृत नसल्याने संबंधित अधिकाऱ्याने आपली ओळख उघड केली नाही. माघारी बोलावण्यात आलेली बॉम्बर विमाने अमेरिकेतील त्यांच्या मूळ तळावर पाठविण्यात आली आहेत.
‘मिलिटरी एअर ट्रॅकिंग अलायन्स’सह हवाई वाहतुकीवर लक्ष ठेवणाऱ्या विविध गटांनी इराणविरुद्ध युद्ध सुरू झाल्यापासून आरएएफ फेअरफोर्ड येथून अमेरिकेच्या डझनभर बी-५२ आणि बी-१ बॉम्बर विमानांच्या हालचाली नोंदवल्या आहेत. रविवारीही या तळावरून अनेक बी-१ बॉम्बर विमानांनी उड्डाण केल्याचे तज्ज्ञांच्या निदर्शनास आले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्धच्या युद्धासंदर्भात पुढील पर्यायांचा विचार करीत असताना बॉम्बर माघारी घेण्याची ही घडामोड घडली आहे. या पर्यायांमध्ये नव्याने हल्ले करण्याचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, युद्ध सुरू करताना ट्रम्प यांनी अमेरिकन नागरिकांना हे अभियान काही आठवडेच चालेल, असे आश्वासन दिले होते.
शनिवारी ट्रम्प यांनी इराणबाबत कठोर भूमिका व्यक्त केली. ‘‘इराणला बुरी तरह तबाह कर दिया गया है. त्यामुळे आता प्रश्न एवढाच आहे की हा मार्ग सोपा असेल की कठीण,’’ असे त्यांनी म्हटले होते. इराणला अण्वस्त्रे विकसित करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले असून, युद्ध संपल्यानंतर तेलाच्या किमती लवकरच कमी होतील, असा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, सप्टेंबरच्या अखेरीस आरएएफ फेअरफोर्ड येथे घडलेल्या सुरक्षा घटनेनंतर ब्रिटनमध्येही दहशतवादी कटाच्या संशयावरून कारवाई करण्यात आली. गेल्या आठवड्यात मध्य लंडनमध्ये एका ब्रिटिश-इराणी नागरिकाला दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान एकूण सहा जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या घटनेचा संबंध तेहरानशी जोडला आहे. मात्र, इराणने या प्रकरणातील सहभाग स्पष्टपणे नाकारला आहे. दुसरीकडे, इराणने यापूर्वी आपल्या भूमीवरील हल्ल्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही लष्करी तळाला योग्य लक्ष्य मानले जाईल, असा इशारा दिला आहे.
इराणशी संबंधित bombers प्रॉक्सी गट ब्रिटनसह अन्य देशांमध्ये जाळपोळ आणि इतर प्रकारच्या हल्ल्यांमागे असल्याचा दावा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केला आहे. यापैकी काही हल्ल्यांमध्ये ज्यू समुदायाला लक्ष्य करून भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. मध्यपूर्वेतील संघर्ष सुरूच राहिल्यास इराण ब्रिटनमधील आपल्या लक्ष्यांची व्याप्ती वाढवू शकतो, असा इशाराही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी यापूर्वी दिला होता.