अनिल कांबळे
नागपूर
wadi satta matka raid वाडी परिसरात सुरू असलेल्या सट्टापट्टी आणि मटका जुगाराच्या अड्यावर एस्कॉर्ट पथकाने धडक कारवाई करीत तब्बल १९ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी ३९ हजार ५६० रुपये रोख रकमेसह जुगाराचे साहित्य असा एकूण ६० हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे वाडी परिसरातील अवैध जुगार अड्डे चालविणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. वाडी ठाणेदाराचे सट्टापट्टी जुगार अड्डे चालकांना अभय असून मोठी वसुली होत असल्याची चर्चा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास एस्कॉर्ट पथकाचे अधिकारी गस्त घालत होते. यावेळी वाडी हद्दीत मराठा सावजी भोजनालयाच्या बाजूला असलेल्या एका गोडावूनजवळ सट्टा मटका जुगार सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तत्काळ घटनास्थळी धाड टाकली. यावेळी मुस्ताक ईस्ताक अहमद (वय ३८, रा. साबळे ले-आऊट, वाडी) हा बुकी साथीदारांच्या मदतीने नागरिकांकडून पैसे स्वीकारून सट्टापट्टी व मटका जुगार खेळविताना पोलिसांच्या हाती लागला. या कारवाईत गौतम भाऊरावजी ढोके (वय ५१, रा. आंबेडकर नगर, वाडी), वसंत पांडुरंग गोरेवार (वय ७०, रा. शाहू ले-आऊट, दत्तवाडी) आणि सतीश श्विदास मेहरे (वय २२, रा. टेकडी, वाडी) यांच्यासह अन्य १५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनास्थळावरून wadi satta matka raid एकूण १९ जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून ३९ हजार ५६० रुपये रोख, तसेच सट्टामटका जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण ६० हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वाडी पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एस्कॉर्ट पथकाचे अधिकारी भगवान कोळी, चंद्रकांत मेहेत्रे आणि साहील भोयर यांनी पार पाडली.