वर्धा,
wardha-reservoir-water-releaseसद्य:स्थितीत पिके माना टाकत आहेत. याच पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील चार मोठ्या व मध्यम जलाशयांतून सध्या पाणी सोडण्यात आले आहे. महाकाळी येथील धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा केवळ पिण्यासाठीच वापर होणे क्रमप्राप्त असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात चार महिन्यांत ८७४.५ मिमी पाऊस पडतो. मात्र, यंदा प्रत्यक्षात केवळ ५५८.३ मिमी पाऊस झाला. सरासरीच्या तुलनेत यंदा ३६.९२ टक्के पाऊस कमी झाला. जिल्ह्यात ११ मोठे व मध्यम जलाशय आहेत. याची एकूण पाणी साठवण क्षमता ६११.०४४ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. सद्य:स्थितीत या अकराही जलाशयांत ४२१.६६८ दशलक्ष घनमीटर इतका जलसाठा आहे. सेलू तालुक्यातील बोर प्रकल्प, आर्वी तालुक्यातील धनोडी, बहाद्दरपूर येथील निम्न वर्धा प्रकल्प आणि कारंजा तालुक्यातील वर्धा कार नदी प्रकल्पातून सिंचनासाठी तर महाकाळी येथील धाम प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी सोडण्यात आले आहे.
बोर प्रकल्पातून २ ऑक्टोबरपासून सिंचनासाठी कॅनलद्वारे पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. आणखी काही दिवस या प्रकल्पातून पाणी सोडणे सुरू राहणार असून या पाळीला संबंधित प्रकल्पातून १ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. या पाण्यामुळे सुमारे १३ हजार हेक्टरवरील पिकांना सिंचन करता येणार आहे. निम्न वर्धा प्रकल्पातून ४ ऑक्टोबरपासून सिंचनासाठी कॅनलद्वारे पाणी सोडण्यात सुरुवात झाली असून आणखी काही दिवस पाणी सोडणे सुरू राहणार आहे. या प्रकल्पातून यंदाच्या पाळीला सुमारे ७ दलघमी पाणी सोडले जाणार आहे. सुमारे १४ हजार हेक्टरवरील पिकांना सिंचन होणार आहे. कार नदी प्रकल्पातून २ ऑक्टोबरपासून सिंचनासाठी पाणी सोडण्यास सुरूवात झाली असून या प्रकल्पातूनही पुढील काही दिवस पाणी सोडणे सुरू राहणार आहे. सुमारे ३.५ दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे.
महाकाळीतून १४ गावांची तहान भागणार
धाम नदीच्या येळाकाळी व पवनार येथील पात्रातून पाण्याची उचल करून नगरपालिका प्रशासन तसेच पिपरी मेघेसह १४ गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करते. शहरासह परिसरातील १४ गावे आणि धाम नदीच्या काठावरील सुमारे १० गावांची तहान भागवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या महाकाळी येथील धाम प्रकल्पातून ३ ऑक्टोबरपासून पिण्यासाठी पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.