आता लग्नासाठी मिळणार 8 ग्रॅम सोनं अन् रेशमी साडी

राज्य सरकारची मोठी घोषणा

    दिनांक :06-Oct-2026
Total Views |
चेन्नई
tamil-nadu-government तामिळनाडू सरकारने गोरगरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि कल्याणकारी निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने आपल्या महत्त्वाकांक्षी ‘अन्नान सीर’ योजनेची अंमलबजावणी सुरू केली असून त्यासाठी 812 कोटी रुपयांच्या पहिल्या हप्त्याला मंजुरी दिली आहे. या विशेष योजनेअंतर्गत वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपर्यंत असणाऱ्या कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी सरकारकडून मोफत 8 ग्रॅम सोन्याचे नाणे आणि एक उत्तम दर्जाची रेशमी साडी भेट म्हणून दिली जाणार आहे. ऐन सणासुदीच्या काळात सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गरिबांची खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली आहे.
 
tamilnadu
 
तमिळ संस्कृती जपणारी योजना
तमिळ संस्कृतीमध्ये लग्नाच्या वेळी मोठ्या भावाकडून बहिणीला दिली जाणारी ही एक आपुलकीची आणि संरक्षणाची परंपरा मानली जाते. याच पारंपरिक भावनेचा सन्मान करत तामिळनाडू सरकारने ही योजना आखली आहे. राज्यात दरवर्षी साधारणपणे 5 लाख विवाह पार पडतात; त्यामुळे गरजूंना या योजनेचा मोठा आधार मिळणार आहे. 2026-2027 च्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार ही योजना लागू करण्यात आली असून केवळ 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या गरजू कुटुंबांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. शासकीय आदेश जारी झाल्याच्या तारखेनंतर पार पडणाऱ्या विवाहासाठीच हे नियम लागू राहतील.

22 कॅरेट शुद्ध सोने अन् पारदर्शक खरेदी प्रक्रिया
या योजनेअंतर्गत दिले जाणारे सोन्याचे नाणे हे 22 कॅरेट शुद्धतेचे असणार आहे. सोन्याची नाणी आणि रेशमी साड्यांची खरेदी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व्हावी यासाठी तामिळनाडू पारदर्शकता कायदा 1998 आणि नियम 2000 च्या चौकटीत राहून रीतसर टेंडर (निविदा) काढले जाणार आहेत. योग्य आणि अधिकृत बोली लावणाऱ्या पुरवठादारांकडूनच या वस्तूंची खरेदी केली जाईल. मुलींच्या लग्नाचा वाढता खर्च लक्षात घेता, सरकारने उचललेले हे पाऊल अत्यंत कौतुकास्पद असून यामुळे अनेक गरीब कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.