अमरावती शिक्षक मतदारसंघाचा गड सर करणे नायकांना अवघड?

बंडखोरी, आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापले

    दिनांक :06-Oct-2026
Total Views |
वाशीम,
amravati-teachers-constituency अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला आता चांगलाच रंग चढला असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यात राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात विविध राजकीय पक्ष, शिक्षक संघटना तसेच अपक्ष उमेदवारांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. २३ ऑटोबर रोजी मतदान, तर २७ ऑटोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
 
 
amravati-teachers-constituency
 
विद्यमान आमदार किरण सरनाईक हे शिवसेना शिंदे गट यांच्यासह काँग्रेस, शिवसेना उबाठा सह विविध इच्छुक निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. मागील निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेल्या सरनाईक यांनी आता शिवसेना शिंदे गटाची साथ घेतल्याने यंदाची निवडणूक त्यांच्या राजकीय वाटचालीची महत्त्वाची कसोटी मानली जात आहे. दरम्यान, शिंदे गटातच उमेदवारीवरून अंतर्गत स्पर्धा आणि बंडखोरीची शयता निर्माण झाल्याचे वृत्त आहे. महायुती तसेच महाविकास आघाडीतील राजकीय समीकरणांवर या निवडणुकीचा परिणाम होण्याची शयता व्यक्त होत आहे. महायुतीमध्ये उमेदवारीवरून स्पर्धा असताना महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून स्वतंत्र उमेदवार उभे राहिल्याने आघाडीच्या एकजुटीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे अंतिम उमेदवारांची संख्या आणि अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसानंतरचे चित्र अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
 
 
दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील निवडणुकीत विद्यमान आमदारांनी काही मतदारांना कथित भेटवस्तू अथवा प्रलोभने दिल्याच्या चर्चेला जोर आला आहे. त्यामध्ये पैठणी साडी वाटपाच्या कथित प्रकाराचीही चर्चा शिक्षक मतदारांमध्ये आहे. काही विरोधकांकडून या संदर्भात आरोप केले जात असून, निवडणुकीच्या काळात मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देणे किंवा निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणे ही बाब गंभीर आहे. भेटवस्तू, कथित आर्थिक प्रलोभने आणि निवडणूक प्रक्रियेत शासकीय यंत्रणेतील काही व्यक्तींचा कथित वापर झाल्याच्या आरोपांमुळे या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी पुढे येण्याची शयता व्यक्त केली जात आहे. निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांना महत्त्व मिळत असले तरी शिक्षक मतदारांच्या प्रत्यक्ष प्रश्नांकडे किती गांभीर्याने पाहिले जाणार, हा मुख्य मुद्दा आहे. शिक्षकांच्या विविध मागण्या, वेतन व सेवा-संबंधित प्रश्न, शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न, जुनी पेन्शन, विनाअनुदानित शाळांचे प्रश्न तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या समस्या यावर उमेदवारांची भूमिका काय आहे, याकडे मतदारांचे लक्ष राहणार आहे.
 
 
मागील निवडणुकीत अपक्ष उमेदवारावर विश्वास व्यक्त करून मतदारांनी वेगळा राजकीय संदेश दिला होता. आता त्याच विश्वासाची पुन्हा परीक्षा होणार आहे. विद्यमान आमदारांसमोर विरोधकांनी आव्हान उभे केले असून, पक्षीय समीकरणे, बंडखोरी, संघटनात्मक ताकद आणि उमेदवारांची वैयक्तिक प्रतिमा या सर्व बाबी निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शयता आहे. मात्र अंतिम चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ९ ऑटोबर असल्याने त्यानंतरच प्रत्यक्ष निवडणुकीतील लढतीचे स्वरूप स्पष्ट होणार आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणापेक्षा शिक्षकांच्या प्रश्नावर कोणता उमेदवार ठोस भूमिका मांडतो, याकडे आता मतदारांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे अमरावती शिक्षक मतदारसंघात यंदा नेमका कोणता राजकीय ‘किरण’ उजळतो आणि कोणाच्या राजकीय आशेवर पाणी फेरले जाते, हे २७ ऑटोबरच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.