अनिल कपूर यांचा ‘सुभेदार’साठी मोठा सन्मान

    दिनांक :06-Oct-2026
Total Views |
मुंबई
anil kapoor अनेक दशकांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय कारकिर्दीनंतरही अभिनेता अनिल कपूर आपल्या दमदार अभिनयामुळे सातत्याने चर्चेत असतात. त्यांच्या या प्रवासात आणखी एका महत्त्वाच्या कामगिरीची भर पडली आहे. ‘सुभेदार’ चित्रपटातील प्रभावी अभिनयासाठी अनिल कपूर यांना Asian Academy Creative Awards 2026 मध्ये ‘नॅशनल विनर – बेस्ट अ‍ॅक्टर इन अ लीडिंग रोल’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे ‘सुभेदार’ने भारतासाठी ‘बेस्ट फीचर फिल्म’ हा पुरस्कारही पटकावला आहे.
 

anil kapoor wins best actor award for subedaar at asian academy creative awards 2026 
‘सुभेदार’मध्ये अनिल कपूर यांनी अर्जुन मौर्य या निवृत्त सैनिकाची भूमिका साकारली आहे. नागरी जीवनाशी पुन्हा जुळवून घेत असताना आपल्या कुटुंबीयांच्या आणि जवळच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी स्थानिक भ्रष्टाचाराविरोधात उभा राहणाऱ्या अर्जुन मौर्यच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांसह समीक्षकांकडूनही मोठी दाद मिळाली. या भूमिकेतील अनिल कपूर यांच्या अभिनयाची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान देण्यात आला आहे.
Asian Academy Creative Awardsच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून अनिल कपूर यांच्या या यशाची घोषणा करण्यात आली. ‘सुभेदार’मधील उल्लेखनीय अभिनयासाठी त्यांची २०२६च्या ‘नॅशनल विनर – बेस्ट अ‍ॅक्टर इन अ लीडिंग रोल’ म्हणून निवड झाल्याचे संस्थेने नमूद केले. आता ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या Asian Academy Creative Awardsच्या Grand Gala Final मध्ये अनिल कपूर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
भारतीय चित्रपटसृष्टीतील दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीचा अनुभव असूनही अनिल कपूर सातत्याने नव्या भूमिका आणि आव्हाने स्वीकारत आहेत. या पुरस्काराबद्दल बोलताना त्यांनी ‘सुभेदार’चे दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी, सहकलाकार तसेच प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले. हा सन्मान आपल्या कारकिर्दीत विशेष महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत, जिद्द आणि प्रामाणिक प्रयत्न या पुरस्कारात प्रतिबिंबित होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.आता ३ डिसेंबरच्या Grand Gala Finalकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्या सोहळ्यात अनिल कपूर जागतिक व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करणार असून, या निमित्ताने भारतीय चित्रपटसृष्टीचा गौरव आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित होणार आहे.