नवी दिल्ली,
rajma malai kofta रोजच्या जेवणात डाळ, बटाटा किंवा पनीरची भाजी खाऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी डिनरसाठी काहीतरी हटके बनवून पाहा. ढाब्यावर मिळणाऱ्या मसालेदार आणि रिच पदार्थांची चव घरच्या स्वयंपाकघरातही अनुभवता येऊ शकते. यासाठी ‘राजमा मलाई कोफ्ता’ हा एक भन्नाट पर्याय ठरू शकतो.
मलाई कोफ्ता हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. मात्र, राजम्यापासून तयार केलेले कोफ्ते या डिशला वेगळीच चव देतात. मऊसर राजमा कोफ्ते काजू आणि मलाईपासून तयार केलेल्या घट्ट ग्रेव्हीमध्ये मिसळल्यावर त्यांची चव अधिकच खुलते. कोफ्ता तोंडात टाकताच विरघळणारा आणि ग्रेव्ही मलाईदार असल्याने हा पदार्थ वीकेंड डिनर किंवा घरी आलेल्या पाहुण्यांसाठीही उत्तम ठरू शकतो.
राजमा मलाई कोफ्त्यासाठी लागणारे साहित्य
कोफ्ते तयार करण्यासाठी एक कप उकडलेला राजमा, दोन उकडलेले बटाटे, एक बारीक चिरलेला कांदा, दोन हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यावी. यासोबत अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ लागेल. कोफ्ते तळण्यासाठी तेल आवश्यक आहे.
मलाईदार ग्रेव्हीसाठी दोन मोठे कांदे आणि तीन टोमॅटोची पेस्ट, एक चमचा आलं-लसूण पेस्ट, ८ ते १० काजूंची पेस्ट आणि अर्धा कप ताजी मलाई किंवा क्रीम घ्यावी. याशिवाय एक-एक चमचा धणे पावडर, हळद आणि काश्मिरी लाल तिखट, एक चमचा कसुरी मेथी आणि दोन चमचे तेल किंवा बटर लागेल.
कोफ्ते तयार करण्याची सोपी पद्धत
सर्वप्रथम उकडलेला राजमा एका भांड्यात घेऊन व्यवस्थित मॅश करून घ्यावा. राजम्यामध्ये अतिरिक्त पाणी राहणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यात उकडलेले बटाटे, चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि गरम मसाला, लाल तिखट व मीठ घालून मिश्रण एकजीव करावे.
तयार मिश्रणाचे छोटे गोल किंवा अंडाकृती आकाराचे कोफ्ते बनवून घ्यावेत. त्यानंतर कढईत तेल गरम करून कोफ्ते सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावेत. तळलेले कोफ्ते एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवावेत.
आता तयार करा ढाबा स्टाइल ग्रेव्ही
ग्रेव्हीसाठी दुसऱ्या कढईत तेल किंवा बटर गरम करून त्यात थोडे जिरे आणि आलं-लसूण पेस्ट परतून घ्यावी. त्यानंतर कांद्याची पेस्ट घालून ती सोनेरी होईपर्यंत शिजवावी. त्यात टोमॅटो पेस्ट, हळद, धणे पावडर आणि काश्मिरी लाल तिखट घालावे. मसाला चांगला परतून तेल सुटेपर्यंत शिजवावा.
मसाला व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात काजूची पेस्ट घालून सुमारे दोन मिनिटे शिजवावी. आता गॅसची आच कमी करून त्यात ताजी मलाई किंवा क्रीम घालावी. ग्रेव्ही फाटू नये यासाठी ती सतत हलवत राहणे गरजेचे आहे.
यानंतर अर्धा कप पाणी आणि चवीनुसार मीठ घालून ग्रेव्हीला एक उकळी द्यावी. ग्रेव्ही घट्ट झाल्यावर त्यात कसुरी मेथी आणि थोडी कोथिंबीर घालून गॅस बंद करावा.
कोफ्ते ग्रेव्हीत कधी घालायचे?
कोफ्ते उकळत्या ग्रेव्हीत थेट घालू नयेत. त्यामुळे ते तुटण्याची शक्यता असते.rajma malai kofta सर्व्ह करताना आधी बाऊलमध्ये कोफ्ते ठेवावेत आणि त्यावर गरम मलाईदार ग्रेव्ही ओतावी.
अशा प्रकारे घरच्या घरी ढाबा स्टाइल ‘राजमा मलाई कोफ्ता’ तयार होईल. हा पदार्थ बटर नान, लच्छा पराठा किंवा जीरा राइससोबत सर्व्ह केला तर त्याची चव आणखी खुलते. नेहमीच्या डिनरपेक्षा काहीतरी वेगळे आणि स्वादिष्ट खायचे असेल, तर ही रेसिपी नक्की ट्राय करता येईल.