हिंगणघाटात वाहतूक नियमभंग करणार्‍यांना दणका

१६ हजार वाहनांची तपासणी, २,६४९ वाहनचालकांवर कारवाई, ३९.१२ लाखांचा दंड

    दिनांक :06-Oct-2026
Total Views |
हिंगणघाट
traffic-rule-violators शहरातील वाढती वाहतूक आणि नियमभंगाच्या पृष्ठभूमीवर हिंगणघाट पोलिसांनी वाहतूक नियमनाची विशेष मोहीम हाती घेतली आहे. १८ ऑगस्ट ते ४ ऑटोबरदरम्यान शहरातील विविध चौक आणि महत्त्वाच्या ठिकाणी सुमारे १६ हजार दुचाकी व इतर वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या २ हजार ६४९ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, तब्बल ३९ लाख १२ हजार ४५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
 
traffic rule
हिंगणघाट शहरात १६ ऑगस्ट २०२६ पासून वाहतूक नियमांबाबत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. नंदोरी चौक, नांदगाव चौक, कलोडे चौक, कारंजा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सुभाष चौक, विठोबा चौक, मनसे चौक यासह शहरातील अन्य महत्त्वाच्या चौकांमध्ये वाहनांची तपासणी करून नियमभंग करणार्‍यांवर कारवाई केली जात आहे. या मोहिमेदरम्यान केवळ दंडात्मक कारवाईवर भर न देता नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृतीही करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीतील निर्देशांनुसार नगर परिषद, राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित बांधकाम कंपनीशी समन्वय साधण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
 
दरम्यान, शहरातील विविध प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी करून नियमभंग करणार्‍या वाहनचालकांवर कारवाई सुरू आहे. व्यापारी संघटना, शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग लासेसच्या संघटनांच्या बैठका घेऊनही वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती केली जात आहे.
अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देऊ नका
वर्धा पोलिस दलाने नागरिकांना वाहन चालविताना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच आपल्या कुटुंबीयांनाही नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करावे आणि अल्पवयीन पाल्यांना नियमबाह्य पद्धतीने वाहन चालविण्यास देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.