कारंजा लाड,
sub-district-hospital शासकीय रुग्णालयांमधील आरोग्य सेवा अधिक दर्जेदार, पारदर्शक आणि गतिमान व्हावी यासाठी कारंजा येथील उप-जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक भाऊसाहेब लहाने यांनी कौतुकास्पद आणि धाडसी पाऊल उचलले आहे. रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचार्यांना कर्तव्य बजावताना ओळखपत्र दर्शनी भागावर लावणे आणि अधिकृत गणवेशाचे पालन करणे त्यांनी बंधनकारक केले आहे.या नियमाचे उल्लंघन करणार्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करण्याचा सज्जड इशाराही त्यांनी जारी केलेल्या कार्यालयीन आदेशात दिला आहे.
अनेकदा शासकीय रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणार्या सामान्य रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना नेमका कर्मचारी कोण आणि बाहेरील व्यक्ती कोण, हे ओळखणे कठीण जाते. यामुळे रुग्णांची फसवणूक किंवा कामात दिरंगाई होण्याचे प्रकार घडतात.हीच अडचण मुळापासून दूर करण्यासाठी डॉ. भाऊसाहेब लहाने यांनी प्रशासकीय शिस्तीचा बडगा उगारला आहे.त्यांच्या या निर्णयामुळे रुग्णालयात येणार्या प्रत्येक नागरिकाला तात्काळ योग्य कर्मचार्याची मदत मिळणे सुलभ होणार आहे.शासन निर्णयाची अत्यंत प्रभावी आणि काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक वाशीम यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय अधीक्षक डॉ.भाऊसाहेब लहाने यांनी दाखवलेली ही तत्परता संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.केवळ आदेश न काढता,त्याची तंतोतंत अंमलबजावणी व्हावी यासाठी त्यांनी स्वतः गांभीर्याने लक्ष घातले आहे.रुग्णालयाची प्रतिष्ठा आणि आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी डॉ.लहाने यांनी घेतलेल्या या शिस्तप्रिय भूमिकेचे कारंजा परिसरातील नागरिक आणि सामाजिक स्तरातून मोठ्या प्रमाणावर स्वागत केले जात आहे.