अनिल कांबळे
नागपूर,
father murdered दारुड्या वडिलाची १७ वर्षीय मुलीवर वाईट नजर होती. घरात कुणी नसताना वडील मुलीशी अश्लील चाळे करीत होता. बापाच्या लैंगिक छळाला कंटाळून मुलीने बापाचा बॅटने डोक्यात प्रहार करुन खून केला. बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. जयराम (४४) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयराम हा पत्नी, मुलगी व मुलासह एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहत होता. तो रोजमजुरी करायचा. त्याला दारुचे व्यसन होते. मुलगी ही बाराव्या वर्गात शिकते तर मुलगा आठव्या वर्गात शिकतो. जयराम हा दारुच्या नशेत मुलीशी अश्लील चाळे करीत होता. कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत होता. तिची आई चार घरी धुणीभांडी करायला जाते. त्यावेळी जयराम मुलीला घरी एकटे बघून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करायचा. नराधम बापाच्या लैंगिक छळाला मुलगी कंटाळली होती. तिने वडिलाला अनेकदा विरोध केला. मात्र, घरात कुणी नसल्यास त्याच्या अंगातील सैताना जागा होत होता.
छळ असह्य झाल्याने केला खून
सोमवारी रात्री आठ वाजता जयराम दारु पिऊन घरी आला. त्यावेळी मुलगी अभ्यास करीत होती तर तिचा भाऊ बाजुला बसलेला होता. जयरामने मुलीला घरात बोलावले. त्याचा इरादा लक्षात आल्याने ती घरात गेली नाही. रागाच्या भरात जयराम बाहेर आला आणि त्याने मुलीला बळजबरी घरात नेण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी लहान भाऊ सर्व प्रकार बघत होता. वडिलाचा छळ असह्य झाल्यामुळे मुलीने घरात ठेवलेली बॅट घेतली आणि वडिलाच्या डोक्यात मारली. त्यामुळे जयराम खाली पडला. त्यानंतर मुलीने बॅटने पुन्हा प्रहार केले. त्यात जयराम गंभीर जखमी झाला.
स्वत:च केला पोलिसांना फोन
नराधम वडिलाचा काही वेळातच मृत्यू झाला. तेवढ्यात आई घरी आली. घडलेला प्रकार मुलीने आईला सांगितला. त्यानंतर मुलीने स्वत: डायल ११२ वर कॉल केला. तिने वडिलाचा खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. एमआयडीसीचे ठाणेदार बाबुराव राऊत लगेच घटनास्थळावर पोहचले.father murdered मुलगी पोलिसांच्या ताब्यात असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्याबाबतची पुढील कायदेशीर प्रक्रिया संबंधित बाल न्यायव्यवस्थेच्या नियमानुसार होणार आहे. या घटनेमागील नेमका घटनाक्रम, हल्ल्याची परिस्थिती आणि मृत्यूचे वैद्यकीय कारण याबाबत पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.