कोरची,
gram-panchayats कोरची तालुक्यातील मोठाझेलिया येथील मनरेगा अंतर्गत मंजूर सार्वजनिक विहिरीच्या कामाबाबत निधी वितरण आणि बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मंजुरीनंतर दीर्घकाळ बांधकाम करण्यात आले नाही व वर्षभरातच प्लॅटफॉर्म तुटले आहे. महत्वाचे म्हणजे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच निधी ग्रामपंचायतीच्या खात्यात कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे दोन वर्षांपूर्वी मोठाझेलिया गावासाठी मनरेगा अंतर्गत सार्वजनिक विहीर मंजूर करण्यात आली होती. मंजुरीनंतर विहिरीचे बांधकाम दीर्घकाळ करण्यात आले नाही. विहिरीचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच मनरेगा कामाचा निधी ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे. कामाची प्रत्यक्ष स्थिती, मोजमाप, कामाचे टप्पे आणि संबंधित कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतरच देयकाची प्रक्रिया केली जाते. त्यामुळे काम अपूर्ण असताना निधी उपलब्ध कसा झाला, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

मनरेगा अंतर्गत कामांच्या विविध टप्प्यांवरील छायाचित्रे तसेच कामाशी संबंधित नोंदी प्रणालीवर अपलोड केल्या जातात. त्यामुळे सदर विहिरीच्या कामाबाबतही प्रत्यक्ष कामाची स्थिती, छायाचित्रे, मोजमाप पुस्तिका, देयक प्रक्रिया आणि निधी हस्तांतरणाची कागदपत्रे तपासण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. सदर प्रकरणाबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर विहिरीचे बांधकाम घाईगडबडीत पूर्ण करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. मात्र, बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही विहिरीच्या गुणवत्तेबाबत समाधानकारक स्थिती नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विहिरीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या महिनाभरातच विहिरीचे प्लॅटफॉर्म पूर्ण तुटले असून विहीर सुद्धा धोकादायक स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. विहिरीचे बांधकाम पाहता ते सुरक्षित आहे की नाही, याबाबतही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली ही विहीर सार्वजनिक उपयोगासाठी करण्यात आली असली तरी सध्या तिच्या स्थितीमुळे नागरिकांना त्याचा अपेक्षित लाभ मिळत नसल्याचे गावकर्यांचे म्हणणे आहे. विहिरीतील पाणी स्वच्छ नसून पिण्यासाठी वापरण्यायोग्य नसल्याची माहितीही स्थानिकांनी दिली आहे. सदर विहिरीच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत असताना संबंधित अभियंता अथवा जबाबदार अधिकार्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कामाची तांत्रिक तपासणी करून दोष आढळल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, या प्रकरणाची तक्रार झाल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. तालुका पातळीवरील संबंधित अधिकार्यांकडून अहवाल मागविण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे चौकशीत निधी नेमका कधी व कोणत्या प्रक्रियेतून ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा झाला, कामाच्या कोणत्या टप्प्यावर देयक प्रक्रिया झाली, तसेच बांधकामाची गुणवत्ता याबाबत काय निष्पन्न होते, याकडे आता लक्ष लागले आहे.
सदर विहिरीचे बांधकाम घाई गडबडीत करण्यात आले असल्यामुळे प्लेटफार्म तुटले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून पावसाळा संपल्यानंतर परत प्लेटफार्म बांधून देण्यात येईल.
कुलदीप वासनिक
अभियंता
पंचायत समिती, कोरची.