लंडन
geoffrey archer जगभरात लोकप्रिय ठरलेल्या ब्रिटिश कादंबरीकार आणि माजी टोरी खासदार जेफ्री आर्चर यांचे वयाच्या ८६व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या प्रकाशक हार्परकॉलिन्सने सोमवारी त्यांच्या निधनाची माहिती दिली. लेखनाच्या सत्रादरम्यान त्यांचे अचानक आणि शांतपणे निधन झाले.
आर्चर यांची साहित्यिक कारकीर्द अनेक दशकांची राहिली. त्यांच्या पुस्तकांच्या ३० कोटींहून अधिक प्रती ११९ देशांमध्ये विकल्या गेल्या. ‘नॉट अ पेनी मोअर, नॉट अ पेनी लेस’ या १९७६ मध्ये प्रकाशित झालेल्या पहिल्या कादंबरीपासून त्यांचा साहित्यिक प्रवास सुरू झाला. त्यानंतर १९७९ मधील ‘केन अँड एबेल’ या कादंबरीने त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी लोकप्रियता मिळवून दिली. वेगवान कथानक आणि थरारक शैलीसाठी ते विशेष ओळखले जात होते.
आर्चर यांचे अखेरचे पुस्तक ‘ॲडम अँड इव्ह’ मंगळवारी प्रकाशित होणार आहे. हार्परकॉलिन्सच्या माहितीनुसार, या पुस्तकाच्या लेखनादरम्यानच त्यांनी आपली शेवटची कादंबरी लिहित असल्याचे स्पष्ट केले होते. या पुस्तकाबद्दल ते अत्यंत उत्साहित होते आणि ते यशस्वीरीत्या पूर्ण झाले, तर आपल्या यापूर्वीच्या कोणत्याही साहित्यकृतीइतकेच ते महत्त्वाचे ठरेल, असे त्यांनी संपादिका केट एल्टन यांना सांगितले होते. यापुढे आणखी कादंबरी लिहिण्याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती.
आर्चर यांची लोकप्रियता त्यांच्या विक्रीच्या आकडेवारीतूनही स्पष्ट होते. त्यांची पुस्तके सलग १४ वर्षे पाच महिने ‘संडे टाइम्स’च्या सर्वाधिक खपाच्या यादीत राहिली, तर ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या बेस्टसेलर यादीत त्यांचा तब्बल साडेपाच वर्षांचा समावेश होता. कथा, लघुकथा आणि इतर साहित्य अशा तिन्ही प्रकारांत ‘संडे टाइम्स’च्या बेस्टसेलर यादीत अव्वल स्थान मिळवणारे ते एकमेव लेखक ठरले.
निधनाच्या आदल्या दिवशीच आर्चर यांनी लंडनमधील लेस्टर स्क्वेअर थिएटरमध्ये झालेल्या खचाखच भरलेल्या कार्यक्रमात शेकडो चाहत्यांची भेट घेतली आणि आपल्या पुस्तकांवर स्वाक्षऱ्याही केल्या. अलीकडील रेडिओ कार्यक्रमांमधून ते ‘ॲडम अँड इव्ह’चा प्रचार करत होते. येत्या शनिवार-रविवारी चेल्टनहॅम साहित्य महोत्सवातही ते सहभागी होणार होते.
हार्परकॉलिन्सच्या यूकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आर्चर यांच्या दीर्घकाळच्या संपादिका केट एल्टन यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. अनेक पिढ्यांना आनंद देणारा लेखक आणि एक जिवलग मित्र गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
राजकारणातून साहित्यापर्यंतचा प्रवास
१५ एप्रिल १९४० रोजी उत्तर लंडनमध्ये जन्मलेल्या जेफ्री आर्चर यांचे बालपण सॉमरसेटमधील वेस्टन-सुपर-मेअर येथे गेले. १९६९ मध्ये ते लिंकनशायरमधील लाउथ मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. सुमारे पाच वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम केल्यानंतर १९८०च्या दशकाच्या मध्यात ते तत्कालीन पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्या नेतृत्वाखालील कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे उपाध्यक्ष झाले.
मात्र, त्यांच्या राजकीय कारकीर्दीवर एका मोठ्या सार्वजनिक घोटाळ्याची छाया पडली. १९८७ मध्ये एका लैंगिक कामगाराशी संबंधित आरोपांवरून त्यांनी ‘डेली स्टार’विरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. या खटल्यात त्यांना विक्रमी पाच लाख पौंड नुकसानभरपाई मिळाली.
१९९९ मध्ये लंडनच्या महापौरपदासाठी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव पुढे आले असताना हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले. त्यांच्या एका माजी सहकाऱ्याने आर्चर यांनी पुरावे बनावट तयार केल्याचा आरोप केला. त्यानंतर आर्चर यांना खोटी साक्ष देणे आणि न्यायप्रक्रियेत अडथळा आणल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आणि चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांनी प्रत्यक्षात दोन वर्षे तुरुंगवास भोगला. याच काळातील अनुभवावर आधारित त्यांनी ‘अ प्रिझन डायरी’ हे पुस्तक लिहिले.
मूळ मानहानीच्या खटल्यादरम्यान न्यायमूर्ती बर्नार्ड कॉल्फिल्ड यांनी आर्चर यांच्या पत्नी मेरी यांच्या साक्षीबाबत ज्युरीसमोर केलेली टिप्पणीही मोठ्या प्रमाणावर चर्चेत आली होती. न्यायालयीन सुनावणीतील त्यांच्या वक्तव्यांमुळे हा खटला अधिकच गाजला.
२००३ मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर जेफ्री आर्चर हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये परतले. त्यानंतर त्यांनी २०२४ मध्ये निवृत्त होईपर्यंत तेथे सेवा बजावली. राजकारण, वादग्रस्त सार्वजनिक जीवन आणि जगभरातील कोट्यवधी वाचकांपर्यंत पोहोचलेले साहित्यिक योगदान अशा विविध पैलूंनी त्यांची कारकीर्द गाजली.