सरकारी नोकरीचे आमिष दाखवून १२ लाखांची फसवणूक

मनपा, मेट्रोमध्ये ओळखीचा दावा; बनावट नियुक्तीपत्र देऊन युवकाला गंडा

    दिनांक :06-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
government job scam शासकीय कार्यालय, नागपूर महानगरपालिका (मनपा) आणि मेट्रो रेल्वेमध्ये ओळख असल्याचे सांगून सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका युवकाची १२ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. आरोपींनी युवकाकडून टप्प्याटप्प्याने रक्कम उकळून त्याला बनावट नियुक्तिपत्रही दिले. मात्र, नोकरी न मिळाल्याने युवकाने पैसे परत मागितले असता आरोपी टाळाटाळ करू लागले. याप्रकरणी शांतिनगर पोलिसांनी सात आरोपींसह त्यांच्या अन्य साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 

government job scam youth cheated of rs 12 lakh in nagpur 
निखिल संदीप मसरके (२६), असे तक्रारदार युवकाचे नाव आहे. २०२५ मध्ये गणेशोत्सवादरम्यान महाल परिसरात त्याची प्रतीक युवराज उराडे (२५) याच्याशी ओळख झाली होती. प्रतीकने त्याच्या मित्रांची शासकीय कार्यालये, नागपूर महानगरपालिका आणि मेट्रो रेल्वेमध्ये चांगली ओळख असल्याचे सांगितले. या ओळखीच्या माध्यमातून निखिलला सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन त्याने दिले. त्यानंतर प्रतीक आणि त्याच्या साथीदारांनी संगनमत करून निखिलला नोकरीचे आमिष दाखविले. नोकरी लावून देण्याच्या नावाखाली त्याच्याकडून वेगवेगळ्या वेळी एकूण १२ लाख रुपये घेतले. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी त्याला बनावट नियुक्तिपत्रही दिले. मात्र, पैसे घेऊनही नोकरी मिळाली नाही. त्यामुळे निखिलने आरोपींकडे पैशांची परतफेड मागितली. त्यावेळी आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. अखेर निखिलने ३ ऑक्टोबर २०२६ रोजी शांतिनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विशाल जाधव (३५), स्वप्निल सहारे (३०), रोशन वानखेडे (३०), दिगंबर शिंदे (२५), सचिन राठोड (३५), अरविंद चौधरी (४०) आणि प्रतीक युवराज उराडे (२५) यांच्यासह अन्य साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैशांच्या व्यवहारासह बनावट नियुक्तिपत्र आणि आरोपींनी केलेल्या दाव्यांची पोलिस चौकशी करीत आहेत.