हरमनप्रीत कौरने सोडली भारतीय कर्णधारपदाची जबाबदारी

    दिनांक :06-Oct-2026
Total Views |
मुंबई
harmanpreet kaur भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने अचानक सर्व प्रकारांतील कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेत तिच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने क्रिकेटमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर काही काळातच हरमनप्रीतने कर्णधारपदाचा राजीनामा जाहीर केला. मात्र, ती खेळाडू म्हणून भारतीय संघाकडून खेळत राहणार आहे. दरम्यान, तिच्यानंतर स्मृती मंधानाकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 

harmanpreet kaur steps down as india women captain, smriti mandhana likely successor 
हरमनप्रीतने २०१६ मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व स्वीकारले होते. त्यानंतर २०२२ मध्ये मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर हरमनप्रीतकडे वनडे संघाचे कर्णधारपदही आले. जवळपास दशकभर भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व केल्यानंतर आता तिने सर्व फॉरमॅटमधून कर्णधारपदाची जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
हरमनप्रीतने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहून आपल्या निर्णयाची माहिती दिली. कर्णधारपद सोडणे हा अत्यंत कठीण निर्णय असल्याचे सांगताना तिने या प्रवासातील अनेक आठवणी, भावना, त्याग आणि आयुष्यभर लक्षात राहणारे क्षण यांचा उल्लेख केला. भारतीय महिला क्रिकेट आणि संघासाठी आपण आपले सर्वस्व दिले असून, त्यासाठी रक्त, घाम आणि वेळ दिला. अनेकदा स्वतःच्या खेळातील प्रगती आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षांनाही बाजूला ठेवावे लागले, कारण संघ नेहमीच प्रथम होता, असे तिने म्हटले.
कर्णधार म्हणून काम करताना अनेक कठीण निर्णय घ्यावे लागल्याचेही हरमनप्रीतने स्पष्ट केले. काही निर्णय सर्वांना समजले नाहीत, तर काही निर्णय घेणे स्वतःसाठीही सोपे नव्हते. अनेकदा त्याची वैयक्तिक किंमतही मोजावी लागली. मात्र, संघ अधिक चांगला बनवणे आणि सहकारी खेळाडूंना पुढे येण्याची, स्वतःवर विश्वास ठेवण्याची तसेच सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी देणे, हा प्रत्येक निर्णयामागील उद्देश होता, असे तिने सांगितले.
आपल्या नेतृत्वाच्या काळात कठीण प्रसंग, पराभव, टीका, शंका आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना केल्याचे सांगतानाच मोठ्या यशाचे क्षणही अनुभवले असल्याचे हरमनप्रीतने नमूद केले. आता भावुक मनाने, मात्र पूर्ण शांततेने कर्णधारपदाची जबाबदारी सोडत असल्याचे तिने म्हटले आहे.
भारतीय महिला संघ सध्या मजबूत स्थितीत असून संघाकडे प्रतिभा आणि आत्मविश्वास आहे, असा विश्वासही हरमनप्रीतने व्यक्त केला. संघाच्या भविष्यातील वाटचालीचा भाग म्हणून पुढेही राहण्याबाबत आपण उत्सुक असल्याचे तिने सांगितले. कर्णधारपदाची जबाबदारी संपत असली तरी भारतीय क्रिकेटवरील आपले प्रेम कायम राहील, असेही तिने स्पष्ट केले.
या प्रवासात साथ देणाऱ्या सहकारी खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, व्यवस्थापन, बीसीसीआय, कुटुंबीय आणि चाहत्यांचेही हरमनप्रीतने आभार मानले. चांगल्या-वाईट प्रत्येक टप्प्यावर साथ देणाऱ्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करत तिने आपल्या क्रिकेटचा प्रवास पुढेही सुरूच राहणार असल्याचे सांगितले.