हरमनप्रीतचा अचानक कर्णधारपदाला 'रामराम'

    दिनांक :06-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
harmanpreets-sudden-goodbye-to-the-captaincy हरमनप्रीत कौरने भारतीय महिला क्रिकेट संघाच्या सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील कर्णधारपदाचा राजीनामा जाहीर केल्याने क्रिकेटविश्वात आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, भारतीय संघाने नुकतेच आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले असताना हा निर्णय समोर आला. मंगळवारी सकाळी हरमनप्रीतने समाजमाध्यमांवरून ही घोषणा केली. मात्र, कर्णधारपदातील बदलाची प्रक्रिया त्याच्या आदल्या दिवशीच सुरू झाली होती.
 
harmanpreet
 
सोमवारी गुवाहाटी येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची बैठक झाली होती. या बैठकीला मंडळाचे सचिव देवजीत सैकिया, हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना आणि महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मजूमदार उपस्थित होते, अशी माहिती समोर आली आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, या बैठकीत हरमनप्रीतला कर्णधारपद सोडण्यास सांगण्यात आल्याचे मानले जात आहे. बैठकीनंतर त्याचे काही दृश्य समाजमाध्यमांवरही प्रसारित झाले.
 
हरमनप्रीत आता ३७ वर्षांची होत असून भारतीय महिला संघाच्या पुढील मोठ्या स्पर्धांसाठी दीर्घकालीन तयारी करण्याच्या दृष्टीने नेतृत्वात बदल करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. टी-२० विश्वचषकातील भारताच्या कामगिरीनंतरही हरमनप्रीतच्या कर्णधारपदाबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर संघाने चांगली कामगिरी करत आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. मात्र, या कामगिरीनंतरही नेतृत्वात बदल करण्यात आला. हरमनप्रीत मात्र खेळाडू म्हणून संघाचा भाग राहणार आहे.
 
हरमनप्रीतनंतर स्मृती मंधानाकडे भारतीय महिला संघाचे नेतृत्व सोपवले जाण्याची शक्यता आहे. सोमवारी झालेल्या बैठकीला तिची उपस्थितीही या बदलाच्या चर्चेला अधिक बळ देणारी ठरली आहे. बीसीसीआयकडून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची अपेक्षा आहे.
 
पुढील विश्वचषकाबरोबरच ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी लक्षात घेऊन भारतीय महिला संघासाठी नव्या नेतृत्वाखाली दीर्घकालीन नियोजन सुरू करण्याच्या दिशेने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. क्रिकेटमध्ये ऑलिम्पिकचा समावेश झाल्याने भारतीय संघासमोर पुढील काळात मोठी आव्हाने असतील. आता कर्णधारपदाची जबाबदारी बाजूला ठेवल्यानंतर हरमनप्रीत खेळाडू म्हणून संघासाठी किती काळ योगदान देते आणि तिची पुढील कामगिरी कशी राहते, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल.