मराठीचा वापर दैनंदिन व्यवहारात वाढवा: मोहन शिरसाट

    दिनांक :06-Oct-2026
Total Views |
वाशीम,
mohan-shirsat मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने मराठी माणसाचे शेकडो वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यामुळे मराठी भाषेचा अभिमान बाळगत दैनंदिन जीवनात तिचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन मोहन शिरसाट यांनी केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, वाशिम आणि वाशिम जिल्हा मराठी भाषा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ते ९ ऑटोबरदरम्यान अभिजात मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या पंधरवड्यानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे आयोजित ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन मोहन शिरसाट यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय काळे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले महाविद्यालय मराठी विभागप्रमुख प्रा. गजानन वाघ आणि गोटे महाविद्यालय इतिहास विभागप्रमुख प्रा. भाऊराव तनपुरे उपस्थित होते.
 

mohan-shirsat 
 
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिरसाट म्हणाले की, ३ ऑटोबर २०२४ हा दिवस मराठी मनासाठी ऐतिहासिक ठरला. केंद्र सरकारने मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा दिला. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी ३ ऑटोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. घर, दुकान, मोबाईल, मित्रांशी संवाद तसेच दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करावा. मोबाईल व संगणकावर मराठी अ‍ॅप्स आणि की-बोर्डचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे यांनी केले. आभार नरेश काळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गौरव आखरे व विलास कांबळे यांनी परिश्रम घेतले. ग्रंथप्रदर्शनास विद्यार्थी आणि वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.