दिल्लीच्या गोटात गांगुलींची एंट्री!

    दिनांक :06-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
indian-premier-league-2027 इंडियन प्रीमियर लीगच्या २०२७ च्या हंगामाआधी दिल्ली कॅपिटल्सने संघाच्या नेतृत्व व्यवस्थेत मोठा बदल केला आहे. माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली यांची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्ली कॅपिटल्सने समाजमाध्यमांवर व्हिडिओ प्रसिद्ध करत या नियुक्तीची माहिती दिली. त्यामुळे आगामी हंगामात दिल्लीच्या संघाची धुरा गांगुलींच्या मार्गदर्शनाखाली असेल.
 
Sourav Ganguly
 
गेल्या हंगामापर्यंत हेमांग बदानी यांनी दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. आता त्यांच्या जागी गांगुली यांची निवड करण्यात आली आहे. दिल्ली कॅपिटल्सला आतापर्यंत एकदाही आयपीएलचे विजेतेपद मिळवता आलेले नाही. त्यामुळे संघाला पहिल्यांदा विजेतेपद मिळवून देण्याचे आव्हान गांगुलींसमोर असणार आहे. त्यांच्यापूर्वी ग्रेगरी शिपर, एरिक सायमन, गॅरी कर्स्टन, पॅडी अप्टन, रिकी पाँटिंग आणि हेमांग बदानी यांनी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली आहे.
 
गांगुली यांचे दिल्ली कॅपिटल्सशी जुने नाते आहे. मार्च २०१९ मध्ये त्यांची संघाच्या सल्लागारपदी नियुक्ती झाली होती. मात्र, ऑक्टोबर २०१९ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी दिल्ली संघापासून दूर होण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयमधील कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर ते पुन्हा दिल्ली कॅपिटल्समध्ये क्रिकेट संचालक म्हणून परतले. या भूमिकेत त्यांनी आयपीएल आणि महिला प्रीमियर लीगमधील संघबांधणी तसेच पडद्यामागील कामकाजात सहभाग घेतला.
 
गांगुली यांनी दिल्ली कॅपिटल्सच्या परदेशातील संघाशीही काम केले आहे. २०२५च्या एसए२० हंगामात दिल्ली कॅपिटल्सची फ्रँचायझी असलेल्या प्रिटोरिया कॅपिटल्सच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.
 
दिल्ली कॅपिटल्ससाठी मागील काही आयपीएल हंगाम अपेक्षेप्रमाणे राहिलेले नाहीत. २०२२पासून संघाला गट फेरीपुढे जाता आलेले नाही. संघाने अखेरचे प्लेऑफ २०२१मध्ये गाठले होते, तर २०२०मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, त्यावेळी विजेतेपद मिळवता आले नव्हते. त्यामुळे आगामी हंगामात संघाची कामगिरी उंचावण्याची आणि विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल करण्याची जबाबदारी आता सौरव गांगुली यांच्या खांद्यावर असणार आहे.