विक्रमाच्या दिशेने ईशानची झेप!

    दिनांक :06-Oct-2026
Total Views |
नवी दिल्ली,
ishan-kishan भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका ६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या मालिकेकडे भारतीय संघाच्या कामगिरीसोबतच ईशान किशनच्या वैयक्तिक विक्रमाच्या दृष्टीनेही लक्ष लागले आहे. २०२६ मध्ये दमदार फलंदाजी करणाऱ्या ईशानकडे याच वर्षात भारतासाठी सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा सूर्यकुमार यादवचा विक्रम मागे टाकण्याची संधी आहे.

ishan-kishan  
 
ईशान किशनने २०२६ मध्ये आतापर्यंत २९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत एक शतक आणि सात अर्धशतकांच्या मदतीने १००५ धावा केल्या आहेत. एका कॅलेंडर वर्षात भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो केवळ दुसरा फलंदाज ठरला आहे. सूर्यकुमार यादवने २०२२ मध्ये ३१ सामन्यांत ११६४ धावा करत हा विक्रम आपल्या नावावर केला होता. त्या वर्षी सूर्यकुमारने दोन शतके आणि नऊ अर्धशतके झळकावली होती. त्यामुळे सूर्यकुमारचा विक्रम मोडण्यासाठी ईशानला आता आणखी १६० धावांची गरज आहे.
 
वेस्ट इंडिजविरुद्धची पाच सामन्यांची मालिका ईशानसाठी ही कामगिरी करण्याची मोठी संधी ठरू शकते. मालिकेत १६० धावा करण्यात त्याला यश आले, तर २०२६ मध्ये भारतासाठी एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी-२० आंतरराष्ट्रीय धावा करणारा फलंदाज म्हणून त्याची नोंद होईल. सध्या या यादीत सूर्यकुमार यादव ११६४ धावांसह पहिल्या, तर ईशान किशन १००५ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. अभिषेक शर्माने २०२५ मध्ये ८५९ धावा केल्या होत्या.
 
ईशानच्या नजरेसमोर केवळ भारतीय विक्रम नसून जागतिक विक्रमही आहे. एका कॅलेंडर वर्षात टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रियाच्या करणबीर सिंगच्या नावावर आहे. त्याने २०२५ मध्ये ३२ सामन्यांच्या ३२ डावांत १४८८ धावा केल्या होत्या. हा विक्रम मोडण्यासाठी ईशानला सध्याच्या १००५ धावांमध्ये आणखी ४८४ धावांची भर घालावी लागेल. या यादीत मोहम्मद रिझवान २०२१ मध्ये १३२६ धावा आणि फियाज अहमद यांनी २०२५ मध्ये १२५१ धावा केल्या असून सूर्यकुमार यादव ११६४ धावांसह चौथ्या स्थानावर आहेत.