मुंबई
madhuri dixit ‘कौन बनेगा करोडपती’च्या विशेष भागात अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने पुन्हा एकदा ‘देवदास’मधील ‘पारो’ची भूमिका साकारत चाहत्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या आठवड्यानिमित्त ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये विशेष पाहुणी म्हणून सहभागी झालेल्या माधुरीने आपल्या अभिनयाची आणि नृत्याची झलक दाखवत अमिताभ बच्चन यांच्यासह उपस्थितांची दाद मिळवली.
शोच्या नव्या प्रोमोमध्ये माधुरी गुलाबी रंगाच्या साडीत दिसत असून, अमिताभ बच्चन यांच्या विनंतीवरून संगणकावर ‘देवदास’ चित्रपटातील ‘काहे छेड मोहे’ हे गाणे लावण्यात येते. आपल्या जागेवर बसूनच माधुरी या गाण्यावर ‘पारो’च्या अंदाजात भावमुद्रा आणि नृत्य सादर करते. तिच्या प्रत्येक अदा आणि अभिनयाने उपस्थित प्रेक्षक भारावून जातात. माधुरीचा हा अंदाज पाहून अमिताभ बच्चनही प्रभावित झाले आणि टाळ्या वाजवत तिचे कौतुक केले. ‘‘क्या बात है! कमाल है, कमाल है, माधुरी जी,’’ अशा शब्दांत त्यांनी तिच्या सादरीकरणाचे कौतुक केले.
या विशेष भागाचा प्रोमो निर्मात्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘माधुरीचा अंदाज, सगळ्यांसाठी खास’ अशा आशयाच्या कॅप्शनसह हा प्रोमो प्रसिद्ध करण्यात आला असून, ‘कौन बनेगा करोडपती’ सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर प्रसारित होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. प्रोमोवर चाहत्यांनीही उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या असून, अनेकांनी या विशेष भागाची उत्सुकतेने प्रतीक्षा असल्याचे म्हटले आहे. काही चाहत्यांनी माधुरीला ‘क्वीन’ अशीही दाद दिली.
दरम्यान, अमिताभ बच्चन madhuri dixit सध्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या १८व्या पर्वाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. हे पर्व सध्या प्रसारित होत आहे. नुकत्याच झालेल्या एका भागात त्यांनी चित्रीकरणादरम्यान घसरून पडल्याने गुडघ्याला दुखापत झाल्याचे सांगितले होते. शोमध्ये आपल्या आसनाकडे धावत येऊन ते लगेच बसले. त्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे उभे राहून मोनोलॉग सादर करता येत नसल्याचे सांगताना, आदल्या दिवशी चित्रीकरणाच्या वेळी घसरून पडल्याने गुडघ्याला दुखापत झाल्याचे स्पष्ट केले.अमिताभ बच्चन यांच्या व्यस्त वेळापत्रकाचीही सध्या चर्चा आहे. ‘कल्कि २८९८ एडी’मध्ये दिसल्यानंतर आता ते प्रभास आणि कमल हासन यांच्यासोबत या चित्रपटाच्या पुढील भागात झळकणार आहेत. त्याचवेळी ‘केबीसी’च्या चित्रीकरणामुळे त्यांचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त झाले आहे. नुकत्याच केलेल्या ब्लॉगमधून त्यांनी झोपेसाठीही पुरेसा वेळ मिळत नसल्याचे सांगितले. रात्रीची झोप शरीरासाठी महत्त्वाची असूनही त्यासाठी वेळ काढणे कठीण जात असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, कामासाठी लवकर उठायचे असल्याने त्या रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी लिहिले. अनेक विचार, कल्पना आणि उद्दिष्टे पूर्ण करण्याची ऊर्जा आपल्याला पुढे काम करण्यासाठी प्रेरणा देत असल्याचे सांगत त्यांनी वेळेत आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी पुन्हा कामाकडे वळण्याची तयारी व्यक्त केली.