शेतकरी, व्यापार्‍यांना फसवणार्‍याला नोएडातून अटक

बियाणे व डिस्ट्रिब्यूटरशिपचे देत होता आमीष

    दिनांक :06-Oct-2026
Total Views |
वर्धा
wardha crime शेतमाल तसेच बियाणे खरेदी-विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी विविध परवाने व डिस्ट्रीब्युशनशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवत शेतकरी व व्यापार्‍यांची आर्थिक फसवणूक करणारा जसवंत सिंग (३९) रा. तमेरी जि. इटावा (उप्र) याला शहर पोलिसांनी सात दिवसात उत्तर प्रदेशातील नोएडा येथून अटक केली.
 
wardha crime
शहर पोलिस ठाण्यात २८ डिसेंबर २०२३ रोजी दाखल झालेल्या प्रकरणाचा तपास सुरू होता. दरम्यान, शेतकरी व व्यापार्‍यांना शेतीमाल तसेच बियाणे खरेदी-विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी आवश्यक विविध परवाने आणि डिस्ट्रीब्युशनशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवत होता. या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत त्याने आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.
 
आरोपीचा शोध घेण्यासाठी वर्धा पोलिसांनी चार वेळा पथके तयार करून शोधमोहीम राबविली होती. मात्र आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर पोलिस निरीक्षक नागेशकुमार चतुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान आरोपीचे मूळ गाव तमेरी तसेच जसवंतनगर, राजमऊ आणि अन्य ठिकाणांची माहिती पोलिसांनी संकलित केली. आरोपी ठिकाणे बदलत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी उपलब्ध तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे त्याचा माग काढला. अखेर मोठ्या शिताफीने आरोपीचे ठिकाण निश्चित करण्यात आले आणि नोएडा येथील सेटर १६८ मधून जसवंत सिंग याला पोलिसांनी ताब्यात घेतले. अटक केल्यानंतर आरोपीला स्थानिक न्यायालयासमोर हजर करून आवश्यक ट्रान्झिट वॉरंट प्राप्त करण्यात आले. त्यानंतर त्याला वर्धा येथे आणण्यात आले असून पोलिस ठाण्यात पुढील कायदेशीर कारवाई व तपास सुरू आहे. आरोपीविरुद्ध इतर ठिकाणीही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत का तसेच त्याने आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याबाबत पोलिस तपास करीत आहेत.
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव जयभाये, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नागेशकुमार चतुरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पथकात पोलिस उपनिरीक्षक शरद गायकवाड, हवालदार धनशाम जाधव, हवालदार महेंद्र पाटील, पोलीस अंमलदार रंजित मुरसे, अमोल साळवे, सायबर सेलचे अक्षय राऊत आदींचा सहभाग होता.