माझी जवळची माणसं फोडली

मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

    दिनांक :06-Oct-2026
Total Views |
पुणे
manoj jarange patil मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला ९० दिवसांचा अल्टिमेटम देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. मागील १५ दिवसांत सरकारने आपल्या जवळच्या व्यक्तींना फोडल्याचा दावा त्यांनी केला. एवढेच नव्हे, तर आपल्या विश्वासातील लोकांनीच आपल्याला धोका दिल्याचेही जरांगे यांनी सांगितले. पुणे दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकार आणि आपल्यावर टीका करणाऱ्यांवर निशाणा साधला.
 

manoj jarange patil government broke my close aides, will reveal names with proof 
मनोज जरांगे पाटील यांनी पुण्यात एमपीएससी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी गरज पडल्यास महाराष्ट्र बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यानंतर सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मागील काही दिवसांतील घडामोडींवर भाष्य केले. ‘‘मागील १५ दिवसांत सरकारने माझ्या जवळची माणसं फोडली. मी गरिबाचा आणि गरिबांसाठी लढणार आहे. माझ्या विरोधात बोलणाऱ्यांना आता पश्चात्ताप होत आहे,’’ असे ते म्हणाले.
समाज संकटात असताना प्रत्येकाने समाजाच्या बाजूने उभे राहण्याची गरज असल्याचे जरांगे यांनी सांगितले. आपण सध्या शांत असून योग्य वेळ येईपर्यंत या विषयावर अधिक बोलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांनाही त्यांनी संकटाचा सामना करण्याचे आवाहन करत आत्महत्या करू नका, असे आवाहन केले.
आपल्या जवळच्या व्यक्तींनीच विश्वासघात केल्याची खंतही जरांगे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील समाज रस्त्यावर उतरला पाहिजे, असे सांगतानाच आपली किंमत दीड लाख रुपये असल्याचा उल्लेख त्यांनी केला. अंतरवाली सराटी गावाने समाजासाठी मोठे योगदान दिले असून त्या गावाबाबत आपण काही बोलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ललिता तारख यांच्याबाबतही आपण बोलणार नसल्याचे सांगत त्यांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले.
‘‘त्या आपल्या भगिनी आहेत. त्यांनाही थांबले पाहिजे. शेवटी हा आपल्या समाजाचा विषय आहे. एक दिवस त्यांनाच आपली चूक लक्षात येईल,’’ असे जरांगे म्हणाले. आपल्या लोकांनीच धोका दिला असला तरी योग्य वेळ आल्यावर त्याला उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
आपल्या माणसांसाठी आपण अनेकदा खूप काही केले; मात्र त्यांच्याकडून अशा प्रकारचे वर्तन होईल, अशी अपेक्षा नव्हती, अशी खंत जरांगे यांनी व्यक्त केली. आपण शांत असल्यामुळे अनेक नावे आता समोर येत असल्याचा दावाही त्यांनी केला. ‘‘मला खूप अनुभव आला आहे. समाजासोबत प्रामाणिक राहा. समाज संकटात असताना त्याच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. आमची माणसं फोडली जात आहेत. लवकरच त्यांची नावे पुराव्यांसह जाहीर करतो,’’ असे म्हणत जरांगे पाटील यांनी सरकारला अप्रत्यक्ष इशारा दिला.