हे काय भलतेच.....बायको घर सोडून गेली अन् पठ्ठ्याने चक्क गाढविणीशी केले लग्न

    दिनांक :06-Oct-2026
Total Views |
सोलापूर
marries-a-female-donkey पत्नीने अचानक संसार सोडून गेल्याने गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या एका पतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी चक्क गाढवीनीसोबत प्रतीकात्मक विवाह केला आहे. सोलापूर जिल्हा परिषद गेटसमोर सुरू असलेल्या या अनोख्या आंदोलनाची सध्या परिसरात चर्चा रंगली आहे. पत्नी पुन्हा आपल्या आयुष्यात परत यावी, या मागणीसाठी संबंधित व्यक्तीने हा अनोखा मार्ग अवलंबल्याचा दावा केला आहे.

donkey marraige
 
दिपक सूर्यवंशी असं या व्यक्तीचं नाव आहे. दिपक सूर्यवंशी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा तब्बल 16 वर्षांचा संसार असून त्यांच्या पत्नी पूजा सूर्यवंशी कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांना सोडून गेल्या आहेत. पत्नीच्या अचानक जाण्याने आपला संसार उद्ध्वस्त झाल्याचं सांगत ते गेल्या 15 दिवसांपासून सोलापूर जिल्हा परिषद गेटसमोर धरणे आंदोलन करत आहेत.
मात्र, वारंवार आंदोलन करूनही प्रशासनाकडून आपल्या मागणीची दखल घेतली जात नसल्याचा आरोप दिपक सूर्यवंशी यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आज चक्क गाढवीनीसोबत प्रतीकात्मक विवाह केला. या अनोख्या आंदोलनामुळे परिसरात उपस्थित नागरिकांचेही लक्ष या प्रकाराकडे वेधले गेले.
दिपक सूर्यवंशी यांनी आपल्या पत्नीला दूर करण्यामागे त्यांचे मेव्हणे गणेश साळुंखे आणि मंगळवेढ्यातील माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. मात्र, या आरोपांबाबत संबंधित व्यक्तींची बाजू समोर आलेली नाही.
आंदोलनस्थळी दिपक सूर्यवंशी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची छायाचित्रेही ठेवली होती. आपल्या प्रश्नाकडे सरकार आणि प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी त्यांची मागणी असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या आंदोलनादरम्यान रीतसर मंगलाष्टक म्हणण्यात आले. त्यानंतर दिपक सूर्यवंशी यांनी गाढवीनीच्या गळ्यात पुष्पहार अर्पण करत प्रतीकात्मक विवाह केला. पत्नीने पुन्हा आपल्या संसारात परत यावे आणि प्रशासनाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा, यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.