कागदावर वृक्षारोपण दाखवून निधीचा अपहार

    दिनांक :06-Oct-2026
Total Views |
मंगरूळनाथ,
plantation-only-on-paper राज्य सध्या भीषण दुष्काळाचा सामना करीत असून, पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी शासनाच्या प्रत्येक विभागाकडून वृक्षारोपण व संवर्धनासाठी दरवर्षी शेकडो कोटी रुपये खर्च केले जात आहेत. मात्र प्रत्यक्षात शासकीय निधी न वापरता कागदोपत्री वापरल्याचा वनविभागानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रताप सावरगांव कान्होबा- कोळंबी - कळंबा- धानोरा या रस्त्यावर प्रत्यक्ष बघितल्यास निदर्शनास आल्याशिवाय राहत नसल्याची उघड वास्तविकता समोर आली आहे.
 
 
 
सावरगांव येथील तब्बल ७५ एकर वनजमिनीत कागदोपत्री झाडे लावून शासनाच्या निधीला चुना लावण्याचा प्रकार तत्कालीन वनाधिकार्‍यांनी केल्याची तक्रार शासन व प्रशासनाकडे प्रलंबित असतानाच, आता सावरगावातूनच कोळंबी - कळंबा मार्गे धानोरा ला जोडण्यासाठी सा.बां. विभागाने जो रस्ता तयार केलेला आहे त्या रस्त्यावर दुतर्फा झाडे लावण्यासाठी मंजूर झालेल्या निधीचा वापर कागदोपत्री झाडे लावून केल्याचे धक्कादायक चित्र दिसत आहे. कळंबा बोडखे ते कोळंबी या साडेसहा किमी रस्त्याच्या दुतर्फा एकही झाड लावलेले दिसत नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला केवळ काटेरी झुडपे, वाळलेले गवत आणि खड्डे पडलेला डांबरी रस्ता दिसत आहे. रस्ता निर्मितीच्या अंदाजपत्रकात प्रत्येक नव्या रस्त्यावर दुतर्फा झाडे लावणे, त्यांना जाळी लावणे, तीन वर्षे जगविणे व पाणी देणे यासाठी लाखो रुपयांची तरतूद असते. मात्र, येथे एकही झाड अस्तित्वात नाही. नियमाप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा १० ते १५ फुट अंतरावर वड, पिंपळ, कडुनिंब, गुलमोहर अशी देशी झाडे लावणे बंधनकारक आहे. या रस्त्याचे काम होऊन २ ते ३ वर्षे झाली तरी झाडे लावलेली नाहीत, याचा अर्थ मंजूर निधी कागदावर खर्च दाखवून गबन झाला आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे. वनविभागाच्या ७५ एकर कागदोपत्री वृक्षारोपण घोटाळ्याची चौकशी अजून सुरू नसतानाच सा.बां. विभागानेही तोच कित्ता गिरवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
 
 
या प्रकरणी कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग, वाशीम यांनी संबंधित ठेकेदार व उपअभियंता यांच्याकडून खुलासा मागवून मंजूर निधी, झाडांची संख्या, जगलेल्या झाडांची माहिती जनतेसमोर आणावी व दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून निधी वसूल करावा, अशी मागणी पर्यावरणवादी जगदीश धांदू जाधव यांच्या वतीने करण्यात आली आहे.
 
 
धानोरा- कळंबा बोडखे -कोळंबी रस्त्यादरम्यान कंत्राटदारा मार्फत झाडे व झाडांना लोखंडी आवरण असलेल्या जाळ्या पाच सहा महिन्यांपूर्वी लावल्याची माहिती या रस्त्याचे काम बघणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे ज्युनिअर इंजिनिअर गणेश वानखडे यांनी दिली. मात्र सध्या जिवंत झाडे किती आहेत याबाबत ते निश्चित माहिती देऊ शकले नाहीत. झाडे जगली नसतील तर ते पुन्हा कंत्राटदारामार्फत लावली जातील, कंत्राटदाराचे पुढील बिल रोखल्या जाईल अशी सारवासारव सुद्धा श्री वानखेडे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीकडे केली.