होर्मुझमध्ये व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला

    दिनांक :06-Oct-2026
Total Views |
मस्कत,
missile-attack ओमानच्या किनाऱ्यालगत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या ‘एमटी ऑन पीस’ या पनामा-ध्वजांकित व्यापारी जहाजावर मंगळवारी क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जहाजावरील १२ खलाशी जखमी झाले असून, त्यापैकी ११ जण भारतीय वंशाचे असल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
 
missile-attack
 
हल्ल्याच्या वेळी जहाजावर एकूण १९ खलाशी होते. त्यापैकी १७ जण भारतीय नागरिक होते. घटनेची माहिती मिळताच ओमानच्या अधिकारी आणि तटरक्षक दलाने तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमी खलाशांना जहाजातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून, त्यांना पुढील उपचारांसाठी ओमानमधील खसाब येथे दाखल करण्यात आले आहे. बचावकार्य आणि तातडीच्या मदतीबद्दल भारत सरकारने ओमान प्रशासनाचे आभार मानले आहेत.
 
व्यापारी जहाजावर झालेल्या या हल्ल्याचा भारताने तीव्र निषेध केला आहे. या भागातून जाणाऱ्या जहाजांवर सातत्याने होत असलेले हल्ले भारतासाठी चिंतेचा विषय असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. व्यापारी जहाजे, खलाशी तसेच नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे तातडीने थांबवण्याची मागणी भारताने केली आहे. आंतरराष्ट्रीय जलमार्गांवरील नौकानयन आणि व्यापार सुरळीत करण्यासाठी या भागातील परिस्थिती लवकरात लवकर सामान्य होणे आवश्यक असल्याचेही भारताने स्पष्ट केले आहे.
 
भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा मुद्दा भारताने यापूर्वीही उपस्थित केला आहे. ओमानच्या किनाऱ्याजवळ १४ भारतीय नागरिक असलेल्या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचाही भारताने निषेध केला होता. दरम्यान, ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकटाच्या काळात खलाशांना मदत मिळावी यासाठी ‘खलाशी आपत्कालीन सहाय्यता नेटवर्क’ स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला होता. जागतिक व्यापार सुरळीत ठेवण्यात खलाशांची महत्त्वाची भूमिका असल्याने त्यांच्या सुरक्षेला आणि आपत्कालीन मदतीला प्राधान्य देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती.