प्रणव सातोकर
नागपूर
nagpur शहरातील मेडिकल चौक परिसरात एकाच खोडातून वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांच्या फांद्या वाढलेला अनोखा वृक्ष सध्या नागरिकांच्या कुतूहलाचा विषय ठरत आहे. या वृक्षात पिंपळ, वड आणि करंजाची वाढ झाल्याचा स्थानिक नागरिकांचा दावा आहे. विशेष म्हणजे, या तिन्ही वृक्षांची खोडे एकाच ठिकाणी एकत्रित झाल्याचे दिसून येते. या वृक्षाचे वय अंदाजे १५ ते २० वर्षे असल्याचे नागरिक सांगतात.
वनस्पतीशास्त्रीयदृष्ट्या, वेगवेगळ्या झाडांची रोपे एकाच ठिकाणी वाढल्यानंतर त्यांच्या खोडांचा नैसर्गिक संयोग होणे शक्य आहे. मात्र, या वृक्षामध्ये नेमक्या कोणत्या प्रजाती आहेत, याची निश्चित ओळख वनस्पतीतज्ज्ञांच्या प्रत्यक्ष पाहणीनंतरच स्पष्ट होऊ शकते. नागपूरच्या निरी परिसरातही खजुराच्या झाडावर वड आणि पिंपळाची वाढ झाल्याचे उदाहरण स्थानिकांकडून सांगितले जाते.
“वड, पिंपळ आणि उंबर nagpur यांसारख्या फायकस प्रजातींची झाडे इतर झाडांच्या खोडांवर, फांद्यांच्या बेचक्यात तसेच काँक्रीटच्या भिंती, विहिरी आणि जुन्या इमारतींवरही रुजू शकतात. पक्षी व प्राण्यांमार्फत त्यांची बीजे विविध ठिकाणी पोहोचतात. खोडांच्या भेगा किंवा भिंतींच्या पोकळ्यांमध्ये साचलेली धूळ, सेंद्रिय पदार्थ आणि ओलावा यामुळे बीजाला रुजण्यासाठी पोषक वातावरण मिळते. सुरुवातीला रोप आधारासाठी दुसऱ्या झाडाचा किंवा संरचनेचा वापर करते. त्यानंतर हवाई व अतिरिक्त मुळे विकसित होऊन जमिनीपर्यंत पोहोचतात. काही प्रजातींमध्ये ही मुळे मूळ झाडाभोवती वाढून त्याला वेढतात. त्यामुळे फायकस प्रजातींची झाडे जैविक तसेच मानवनिर्मित संरचनांवर वाढण्याची विलक्षण अनुकूलनक्षमता दर्शवतात.”»
— डॉ. लाल सिंग, वरिष्ठ वैज्ञानिक निरी