म्हणे, खाजगी ट्रॅव्हल्स पार्किंगसाठी मनपाकडे जागा नाही!

उपायुक्त संदीप चिद्रवार यांचे अजब स्पष्टीकरण

    दिनांक :06-Oct-2026
Total Views |
चंद्रपूर
private-travel-bus-parking महानगरात भर रस्त्यात उभ्या राहणार्‍या खाजगी ट्रॅव्हल्सच्या डेपोसाठी महानगर पालिकेकडे कोणतीही स्वतंत्र जागा उपलब्ध नाही, असे अजब स्पष्टीकरण मनपाचे उपायुक्त संदीप चिद्ररवार यांनी दिले! एवढेच नव्हे तर, वाहतूक सुरळीत करणे हा पोलिसांच्या वाहतूक विभागाचे काम आहे. मनपाचे नाही, असे म्हणत हा विषय टोलावला!!
 
 
private bus
 
चंद्रपूर महानगरात आधीच रस्ते लहान आहेत. त्यात मोठ्या ट्रॅव्हल्स गाड्या रस्त्यातच उभ्या राहतात अणि वाहतूक खोळंबते. याविषयी जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक अमोल बारापात्रे तसेच विभागीय परिवहन अधिकारी श्याम लोही यांना विचारणा केली असता, ट्रॅव्हल्सच्या स्थानकासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव वारंवार महानगर पालिकेच्या यंत्रणेकडे पाठवला आहे. मात्र, त्यांच्याकडून यथायोग्य प्रतिसाद मिळत नाही, असे त्यांनी उत्तर दिले. याबाबत मनपाचे उपायुक्त आयुक्त संदीप चिद्ररवार यांना विचारणा केली असता ते म्हणाले, आमच्याकडे कुठलीही जागा उपलब्ध नाही आणि तसाही हा विषय वाहतूक विभागाचा आहे.
 
शहरातील वरोरा नाका चौकापासून अगदी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयापर्यंतच्या रस्त्यावर खाजगी ट्रॅव्हल्स हक्काची जागा असल्याप्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून उभ्या राहतात. तसेच चक्क पोलिस मुख्यालयासमोरही अनेक खाजगी ट्रॅव्हल्स गाड्या प्रवासी भरण्यासाठी गाड्या तासन्तास उभ्या ठेवतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. पादचारींनाही नाहक त्रास सहन करावा लागतो. शिवाय अपघाताचा धोका वाढतो. या समस्येवर वाहतूक पोलिस प्रशासनाकडून केवळ दंडात्मक कारवाईचे सत्र सुरू असते. परंतु, या खाजगी ट्रॅव्हल्सला शहराबाहेर एक जागा द्यावी आणि तेथूनच या गाड्या सुटाव्या यासाठी महापालिकेकडे कोणताही ठोस आराखडा सध्या तरी दिसत नाही.
 
महापालिकेने शहराच्या वेशीवर किंवा मोकळ्या जागेवर खाजगी बसेस टर्मिनल उभारावेत. त्या जागा मालकांसोबत मिळून ‘पे अँड पार्किंग’ सुविधा सुरू करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे.
हा वाहतूक विभागाचा विषय : उपायुक्त चिद्दरवार
खासगी ट्रॅव्हल्स पार्किंग हा वाहतूक विभागाचा विषय आहे. महानगरपालिकेने या बसेसच्या पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी शहराच्या बाहेर अथवा आसपास कोणतीही जागा उपलब्ध नाही, असे उपायुक्त संदीप चिद्रवार यांनी सांगितले.