मुंबई
ramayana movie दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटाच्या सेटजवळ आगीची घटना घडल्याने चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली. गोरेगाव पूर्व येथील फिल्म सिटी परिसरातील तात्पुरत्या सेटला सोमवारी (५ ऑक्टोबर) दुपारी आग लागली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने (FWICE)ही या घटनेला दुजोरा दिला आहे.
सोमवारी दुपारी ४.०२ वाजता प्राईम फोकस स्टुडिओच्या मागील बाजूस असलेल्या तात्पुरत्या सेटमधील पीसीआर युनिटमध्ये अचानक आग लागली. हा परिसर रिलायन्स मीडिया वर्क्सच्या मागील बाजूस आहे. आग लागल्यानंतर सेटमधून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर येत असल्याचे दिसून आले. हा सेट अभिनेता रणबीर कपूर अभिनीत आगामी ‘रामायण’च्या शूटिंग सेटच्या जवळच होता. मात्र, आग मुख्य शूटिंग सेटपर्यंत पोहोचली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
आगीमध्ये विजेच्या तारा, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, केबल्स, लाकडी फळ्या, दरवाजे, एसी युनिट्स, बांबू आणि प्लास्टिकच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले. तसेच साऊंड सिस्टीमसह शूटिंगसाठी वापरली जाणारी अनेक उपकरणे आगीत जळून खाक झाली.
घटनेची माहिती ramayana movie मिळताच मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, बीएमसी वॉर्ड कंट्रोल रूम तसेच १०८ रुग्णवाहिका सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित बचावकार्य सुरू केले. सुमारे तासभर प्रयत्न केल्यानंतर दुपारी ४.५५ वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
अग्निशमन दलाच्या सायंकाळी ५.१६ वाजता जारी करण्यात आलेल्या अद्ययावत माहितीनुसार, ही लेव्हल-१ स्वरूपाची आग होती. प्राथमिक स्वरूपाची ही आग नियंत्रणात आणण्यात आली असून, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, अग्निशमन दलाकडून त्याचा तपास सुरू आहे.