देवीभत सतीश खाडेची मृत्यूशी झुंज संपली

समृद्धी महामार्गावरील अपघातातील मृतांची संख्या आठ

    दिनांक :06-Oct-2026
Total Views |
वर्धा
samruddhi-mahamarg-accident शेगाव येथून समृद्धी महामार्गाने दुर्गा मूर्ती आणत असताना झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या आता आठवर पोहोचली आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सतीश पांडुरंग खाडे (३७) यांची मंगळवार ६ रोजी दुपारी नागपूर येथील एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.
 
accident
सिंदी मेघे सोमनाथे ले-आऊटमधील सुमारे ३० देवीभत २८ सप्टेंबर रोजी शेगाव येथे दुर्गा मूर्ती आणण्यासाठी गेले होते. मंडळाने तयार केलेल्या रथात दुर्गा मूर्ती ठेवून हा रथ मालवाहू वाहनाला जोडण्यात आला होता. २९ सप्टेंबर रोजी सुमारे २६ देवीभत दुर्गा मूर्ती घेऊन वर्धेच्या दिशेने निघाले. समृद्धी महामार्गावर मागाहून आलेल्या ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात घनश्याम पाटील (६०), मुनेश्वर ढोले (५३), दत्ता खुरसंगे (५३), प्रवीण बकाने (५०), ओम गावंडे (२२), गोलू ऊर्फ सचिन बादलमवार (३८) आणि रोशन राऊत (२६) यांचा मृत्यू झाला होता. तर १९ जण जखमी झाले होते.
 
जखमी सतीश खाडे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सावंगी रुग्णालयातून नागपूर येथील एम्समध्ये हलविण्यात आले होते. या अपघातात त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली होती. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, मंगळवारी दुपारी २.४५ वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सतीश खाडे यांच्या निधनामुळे या अपघातातील मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे. सतीश खाडे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, अडीच वर्षांची मुलगी, असा आप्त परिवार आहे.