घर-उंबरठे सुरक्षित करा...

    दिनांक :06-Oct-2026
Total Views |
अग्रलेख  
 

6 oct agralekh एखाद्या घरातून मुलगी अचानक गायब होते. सकाळपर्यंत घरात असलेली मुलगी दुपारी कॉलेजमध्ये नसते. फोन बंद असतो. मैत्रिणींना काहीच माहिती नसते. संध्याकाळ होते. घरच्यांची धावपळ सुरू होते. रात्री पोलिस ठाण्याची पायरी चढावी लागते. काही तासांत एका कुटुंबाच्या विश्वात उलथापालथ होते. अशा घटना आता अपवाद राहिलेल्या नाहीत. साऱ्या देशात आणि त्यातही महाराष्ट्र व शेजारच्या मध्यप्रदेशात अशा घटनांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रात २०२४ व २०२५ या दोन वर्षांत ९३ हजारावर मुली, महिला बेपत्ता झाल्या. म्हणजे वर्षाला पंचेचाळीस हजाराहून अधिक अल्पवयीन मुली- महिला बेपत्ता होत आहेत. २०२६ हे साल संपत आलेले असताना या घटना थांबलेल्या नाहीत. जत, छ. संभाजी नगर, धुळे, लातूर, पुणे, अमरावती अशा अनेक ठिकाणांवरून या घटनांबाबतच्या बातम्या येत आहेत. बेपत्ता झालेल्या प्रत्येकाचे अपहरण होते असे नाही.

 
 

अपहरण किंवा तस्करीची शिकार
 
 
पण, कुणाचेच अपहरण होत नाही, असेही नाही. घरातून रागाच्या भरात निघून गेलेली मुलगी, प्रेमसंबंधामुळे घर सोडलेली तरुणी, मानसिक तणावामुळे संपर्क तोडलेली महिला, नोकरीच्या शोधात दुसऱ्या शहरात गेलेली महिला, कुटुंबाला न सांगता विवाह केलेली मुलगी आणि प्रत्यक्षात अपहरण किंवा तस्करीची शिकार झालेली मुलगी या सगळ्यांची सुरुवातीची पोलिस नोंद बेपत्ता अशी असू शकते. त्यापैकी काही महिला व मुली परत येतात हे खरे. मात्र, त्यामुळे हा विषय चिंतेचा नाही, असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. कारण सापडलेल्या व्यक्तींपैकी किती जण स्वेच्छेने गेले होते, किती जणांना जबरदस्तीने नेण्यात आले होते, किती जण तस्करीच्या विळख्यात सापडले होते, किती जण लैंगिक शोषणाचे बळी झाले, किती जण घरगुती हिंसाचारामुळे पळाले होते आणि किती जणांना घरी परत यायचेच नव्हते, या प्रश्नांची सामाजिक चिकित्सा अजून पुरेशी झालेली नाही.
या गंभीर प्रश्नाचे अनेक पदर आहेत. पहिला पदर म्हणजे वयात येणाऱ्या मुलींची वाढती स्वायत्तता आणि कुटुंबातील संवादाचा अभाव. १५ ते १८ हे वय अत्यंत संवेदनशील असते. या वयात मुलगा किंवा मुलगी पालकांपासून मानसिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करतो. प्रेम, आकर्षण, मैत्री, लैंगिक कुतूहल, करीअर, शरीरातील बदल आणि स्वातंत्र्याची इच्छा या सगळ्या गोष्टी एकाच वेळी सुरू असतात. मुलीने या काळात एखाद्या व्यक्तीशी ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष जवळीक निर्माण केली आणि घरात तिच्याशी संवाद होत नसेल, तर घरातल्यांना तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची माहिती शेवटची मिळते. दुसरा पदर आहे सोशल मीडिया आणि डिजिटल विश्वाचा. सोशल नेटवर्क्सवरून ओळखी होतात आणि त्याचे अनेकांच्या बाबतीत काय परिणाम होतात, हे साऱ्यांना माहिती आहे. समोरची व्यक्ती सांगत असलेले नाव, वय, लिंग हे किंवा फोटो खरा असेलच असे नाही. तरीही काही दिवसांत अनेकांची अशा व्यक्तींशी भावनिक जवळीक निर्माण होते. तिसरा पदर आहे घरातील ताणतणावाचा. शिक्षणाचा ताण, लग्नाचा दबाव, प्रेमसंबंधाला विरोध, कौटुंबिक हिंसा, नातेसंबंधातील समस्या, लैंगिक शोषण, पालकांमधील भांडण, आर्थिक संकट किंवा अत्यंत नियंत्रणवादी पालकत्व अशा अनेक कारणांमुळे एखादी मुलगी-मुलगा घर सोडण्याचा निर्णय घेऊ शकते. चौथा पदर आहे गरिबी आणि स्थलांतर. कामाच्या शोधात शहरांकडे जाणारी कुटुंबे, बांधकाम क्षेत्रातील स्थलांतरित मजूर, घरकाम करणाऱ्या महिला, असंघटित क्षेत्रातील कामगार, ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी आलेल्या मुली या सर्वांमध्ये सामाजिक निगराणीची पारंपरिक व्यवस्था कमजोर होते.

यातील पाचवा पदर आहे मानव तस्करीचा आणि तो अत्यंत धोकादायक आहे. मानवी तस्करीचा घृणास्पद धंदा करणाऱ्यांसाठी असुरक्षित, गरीब, अल्पशिक्षित, घरापासून तुटलेल्या किंवा डिजिटल माध्यमातून फसवलेल्या मुली-महिला-बालके हे चांगले सावज असतात. पालक-कुटुंबप्रमुख म्हणून या समस्येवर चर्चा करताना नेहमी सरकारकडे पाहतो. पण एक प्रश्न अनुत्तरित ठेवतो. तो असा की- आपल्या मुलांच्या किंवा कुटुंबाच्या आयुष्यात आपण कितपत गांभीर्याने उपस्थित आहोत? प्रत्येक घरात पोलिस ठेवता येत नाहीत. प्रत्येक मुलीच्या मागे महिला पोलिस ठेवता येत नाही. प्रत्येक रस्त्यावर सीसीटीव्ही लावता येत नाही. प्रत्येक मोबाईल संभाषण पोलिस ऐकू शकत नाहीत. सामाजिक सुरक्षिततेची पहिली भिंत सरकारची नसतेच. ती कुटुंबाचीच असते. आजकालच्या युगात पालकांनी नुसती चिंता किंवा चिडचिड करून उपयोग नाही. त्यांनी संयमी आणि सावध असले पाहिजे. त्यांना मुलाच्या डिजिटल व्यवहार-विश्वाची माहिती असली पाहिजे. आपल्या मुलाचे-मुलीचे कोण मित्र आहेत? ती-तो ऑनलाईन कोणाशी बोलतो? कुणी तिला किंवा त्याला महागड्या भेटवस्तू देतोय का? कुणी फोटो किंवा व्हिडीओ मागतोय का? कुणी “हे आई-बाबांना सांगू नकोस” असे सांगतोय का? कुणी भेटायला बोलावतोय का? या मुद्यांच्या अनुषंगाने मुलांकडे-मुलींकडे पालकांचे लक्ष असलेच पाहिजे. मोबाईल काढून घेणे किंवा तो दररोज तपासणे हा उपाय नाही. मुली आणि मुलांशी मित्रत्वाचा व्यवहार केला पाहिजे. त्यांनी सत्य सांगावे यासाठी घरात तसे वातावरण निर्माण केले पाहिजे. मुलींना फक्त रस्त्यावर भेटलेल्या अनोळखी व्यक्तीपासून नव्हे तर ओळखीच्या व्यक्तीच्या डिजिटल रूपापासूनही सावध असण्याची आवश्यकता आहे. मुलींना घर हा आपला आधार आहे आणि घरातली माणसे आपली आहेत, असे वाटले पाहिजे. खोटे प्रोफाईल कसे ओळखायचे, खाजगी फोटो मागितल्यास काय करायचे आणि कुणी धमकी दिली तर पालकांना सांगणे आवश्यक आहे, हेही तिला समजले पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे- “मी चूक केली तरी आई-बाबा मला आधी वाचवतीलच”, हा विश्वास घरातल्या प्रत्येक मुलीच्या मनात असला पाहिजे. हा विश्वास पोलिसी व्यवस्थेपेक्षा अधिक शक्तिशाली सुरक्षितता देणारा असतो. फक्त अतिनियंत्रणाच्या फंद्यात पालकांनी पडू नये. त्याने सुद्धा धोका वाढतो. अमक्याशी बोललीस तर घराबाहेर पडू नये, असे म्हटल्यावर ती मुलगी दुसरा फोन वापरू शकते. दुसरे अकाऊंट सुरू करू शकते. खोटे बोलू लागते. पालकांना तिच्या आयुष्यात घडत असलेल्या घटनांची माहिती मिळणे पूर्णपणे बंद होते. विवाहित महिलांच्या बाबतीतही अनेक कुटुंबांत असे घडू शकते. पालकत्वाचा अर्थ नियंत्रण असा होत नाही. संवाद-विश्वासासह नियंत्रण, स्वातंत्र्यासह जबाबदारी आणि प्रेमासह शिस्त हा समतोल आवश्यक आहे. “अनोळखी व्यक्तीपासून सावध राहा” हा जुना धडा पुरेसा नाही. आजचा धडा असा हवा की, ओळखीच्या व्यक्तीवरही विश्वास ठेवू नका. आपल्यासोबत काही चुकीचे घडले किंवा घडते आहे, असे वाटले तर न घाबरता ते घरी सांगा.6 oct agralekh बेपत्ता मुलींचा-महिलांचा प्रश्न म्हणजे स्त्रीसुरक्षेचा प्रश्न आहेच. तेवढाच तो कुटुंबातील संवादी वातावरणाचा व विश्वासाचा प्रश्न आहे. सरकारने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. पोलिसांनी तक्रारीकडे दुर्लक्ष करता कामा नये. मानव तस्करी, अपहरण आणि लैंगिक शोषणाच्या साखळ्या मोडल्या पाहिजेत. पण, शेवटी प्रत्येक पालकाने स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे आणि तो असा की, माझ्या घरातली महिला, मुलगी किंवा अन्य कुणीही संकटात सापडले तर ते सर्वांत आधी माझ्याकडे येईल का? या प्रश्नाचे उत्तर “हो” असेल, तर त्या घरात सुरक्षेची सर्वांत भक्कम भिंत उभी आहे, असे मानता येते. याचे उत्तर नाही किंवा “माहिती नाही” असे असेल, तर आपले घर आणि आपले उंबरठे सुरक्षित करावे लागतील.