मुलीचे आक्षेपार्ह चित्रीकरण; तरुणावर गुन्हा दाखल

    दिनांक :06-Oct-2026
Total Views |
वाशीम,
washim शहरातील एका नामांकित मुलींच्या शाळेत सोमवारी, ५ ऑटोबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गंभीर आणि संतापजनक घटना घडली. शाळेतील स्वच्छतागृहात एका २४ वर्षीय तरुणाने मोबाईलद्वारे मुलीचे गुपचूप आक्षेपार्ह चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे वाशीम शहर पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला तत्काळ बेड्या ठोकल्या आहेत.
 
 
washim
 
शाळेच्या शेजारीच एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तेथे काम करणार्‍या मजुरांच्या सतर्कतेमुळे हा विकृत प्रकार वेळेत उघडकीस आला. हा तरुण मुलींच्या स्वच्छता गृहाजवळ अत्यंत संशयास्पद हालचाली करत मोबाईलद्वारे चित्रीकरण करत असल्याचे मजुरांच्या निदर्शनास आले. घटनेचे गांभीर्य ओळखून मजुरांनी जराही वेळ न दवडता थेट शाळेच्या मुख्याध्यापकांकडे धाव घेऊन या प्रकाराची माहिती दिली. मुख्याध्यापकांनी तातडीने वाशीम शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच वाशिम शहर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला तत्काळ ताब्यात घेतले.पंकज चंद्रशेखर लांजेवार (वय २४ वर्षे, रा. वेणी गणेशपूर, ता. नंदगाव खंडेश्वर, जि. अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो वैद्यकीय प्रतिनिधी (मेडिकल रिप्रेझेंटटिव्ह) म्हणून काम करतो.
 
 
याप्रकरणी वाशीम शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पॉसो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा विकृत आणि नराधम प्रवृत्तीच्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांमधून जोर धरत आहे. वाशीम शहर पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.