नवी दिल्ली,
harmanpreet हरमनप्रीत कौरने भारतीय महिला क्रिकेट संघाच्या तिन्ही प्रकारांतील कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता संघाचे पुढील नेतृत्व कोण करणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मंगळवारी हरमनप्रीतने समाजमाध्यमांवरील भावनिक संदेशातून कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. त्यामुळे तिच्या जागी अनुभवी खेळाडूकडे नेतृत्व सोपवले जाणार की क्रिकेटच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या खेळाडूंना कर्णधारपद दिले जाणार, याकडे लक्ष लागले आहे.
हरमनप्रीतनंतर कर्णधारपदासाठी स्मृती मंधानाचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. ती भारतीय संघाची उपकर्णधार असून हरमनप्रीतच्या अनुपस्थितीत तिने संघाचे नेतृत्वही केले आहे. स्मृतीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोठा अनुभव असून महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचे नेतृत्व करताना तिने संघाला विजेतेपद मिळवून दिले आहे. त्यामुळे नेतृत्वाचा अनुभव आणि संघातील स्थान यामुळे मंधाना हा महत्त्वाचा पर्याय मानला जात आहे.
मंधानासोबत जेमिमा रॉड्रिग्सचे नावही कर्णधारपदासाठी पुढे येत आहे. संघातील नियमित खेळाडू असलेल्या जेमिमाचा नेतृत्व गटात समावेश आहे. तिने दिल्ली कॅपिटल्सच्या महिला संघाचे नेतृत्वही केले आहे. त्यामुळे भविष्यातील नेतृत्वासाठी तिच्याकडेही पर्याय म्हणून पाहिले जात आहे.
यष्टीरक्षक-फलंदाज रिचा घोष हिचाही कर्णधारपदाच्या संभाव्य दावेदारांमध्ये समावेश आहे. आक्रमक फलंदाजीसोबत यष्टीमागून खेळाचे निरीक्षण करण्याचा अनुभव रिचाकडे आहे. तिच्या नेतृत्वक्षमतेचा संघ व्यवस्थापनाकडून विचार केला जाऊ शकतो. अनुभवी खेळाडूंच्या यादीत दीप्ती शर्माचे नावही महत्त्वाचे आहे. भारतीय महिला क्रिकेटच्या बदलत्या प्रवासात दीप्तीने महत्त्वाची भूमिका बजावली असून तिला मोठा आंतरराष्ट्रीय अनुभव आहे. महिला प्रीमियर लीगमध्ये यूपी वॉरियर्सचे नेतृत्व करण्याचा अनुभवही तिच्याकडे आहे.
क्रिकेटच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या कर्णधारांची निवड करण्याचा निर्णय झाल्यास शेफाली वर्माचाही विचार होऊ शकतो. ती गेल्या जवळपास पाच वर्षांपासून भारतीय संघाचा भाग आहे. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शेफालीला देशांतर्गत क्रिकेटमध्ये नेतृत्वाचा अनुभव आहे. त्यामुळे हरमनप्रीतनंतर भारतीय महिला संघाच्या नेतृत्वासाठी स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष, दीप्ती शर्मा आणि शेफाली वर्मा ही पाच नावे चर्चेत आहेत. अंतिम निर्णय संघ व्यवस्थापन आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून घेतला जाणार आहे.