वन्यजीव भ्रमणमार्गाच्या संरक्षणासाठी 15 किमी पायी प्रवास

140 हून अधिक वन्यजीवांचा रेल्वे अपघातात मृत्यू

    दिनांक :06-Oct-2026
Total Views |
चंद्रपूर
wildlife corridors वन्यजीवांचा सुरक्षित अधिवास आणि त्यांच्या नैसर्गिक भ्रमणमार्गाच्या संरक्षणासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने हॅबिटॅट कन्झर्व्हेशन सोसायटीच्या वतीने रविवारी ‘पायी चाल’ हा उपक्रम राबविण्यात आला. संस्थेच्या सदस्यांनी चांदा फोर्ट रेल्वे स्थानक ते चिचपल्ली असा सुमारे 15 किलोमीटरचा पायी प्रवास तीन तासात पूर्ण केला.
 
 
wildlife
चांदा फोर्ट ते चिचपल्ली परिसर हा कावल-ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला जोडणार्‍या महत्त्वपूर्ण वन्यजीव भ्रमणमार्गाचा भाग आहे. या मार्गातून वाघ, बिबट, अस्वल, रानगवा, सांबर, चितळ यांसह अनेक वन्यजीवांची नियमित ये-जा असते. मात्र, या संवेदनशील वनक्षेत्रातून जाणारा बल्लारशाह-गोंदिया रेल्वेमार्ग तसेच परिसरातील रस्ते आणि महामार्गांमुळे वन्यजीवांच्या नैसर्गिक हालचालींवर परिणाम होत आहे. त्यातून वन्यजीवांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाणही चिंताजनक बनले आहे.
 
हॅबिटॅट कन्झर्व्हेशन सोसायटीकडून 2017 पासून या रेल्वेमार्गावरील वन्यजीवांच्या हालचाली, रेल्वे अपघात आणि त्यामध्ये होणार्‍या वन्यजीवांच्या मृत्यूंची सातत्याने नोंद ठेवली जात आहे. संस्थेच्या नोंदीनुसार 2017 ते 2026 या दहा वर्षांच्या कालावधीत या रेल्वेमार्गावर झालेल्या अपघातांमध्ये 140 हून अधिक वन्यजीवांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 17 वाघ, 27 रानगवे, 26 चितळ, 15 अस्वल, 7 बिबट्या, 19 सांबर आणि 4 तडस यांसह विविध वन्यजीवांचा समावेश आहे.
 
वन्यजीव भ्रमणमार्ग अबाधित ठेवणे, रेल्वे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे, वन्यजीवांच्या हालचालींसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे आणि या प्रश्नाकडे संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधणे, हा या पायी प्रवासाचा प्रमुख उद्देश होता. विकासकामे आणि वाहतूक व्यवस्था आवश्यक असली तरी त्यासोबत वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.