गडचिरोली,
lloyds-diamonds-pune-volleyball-league पुणे व्हॉलीबॉल लीगच्या (PVL) दुसऱ्या हंगामात लॉयड्स डायमंड्स संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात संघाने झील थंडरबोल्टचा सरळ तीन सेटमध्ये ३-० असा पराभव करत शानदार विजय नोंदविला. स्पर्धेत सहा संघ सहभागी झाले होते. संपूर्ण स्पर्धेत लॉयड्स डायमंड्सने सांघिक एकजूट, शिस्त, कौशल्य आणि जिद्दीच्या जोरावर प्रभावी कामगिरी केली. अंतिम सामन्यातही संघाने सुरुवातीपासून वर्चस्व राखत विजेतेपदावर नाव कोरले.

महाराष्ट्र व्हॉलीबॉलच्या संयुक्त विद्यमाने व्हिटाफिट कॉर्पोरेटतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अंतिम सामना भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाचे प्रशिक्षक अजित पाटील यांच्यासह मान्यवर, अधिकारी आणि व्हॉलीबॉलप्रेमींच्या उपस्थितीत पार पडला. लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरण यांच्या मार्गदर्शनाखाली लॉयड्स समूहाकडून क्रीडा क्षेत्राला सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. युवा खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांच्या कौशल्याला वाव देण्याच्या या प्रयत्नांतून लॉयड्स डायमंड्सचे हे यश मिळाले आहे. या विजयामुळे लॉयड्स मेटल्स, लॉयड्स इनफिनाइट फाउंडेशन आणि लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीमध्ये आनंदाचे वातावरण आहे.