सुलतानपूर,
3 Tennis Players Die in Accident उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यात पूर्वांचल द्रुतगती मार्गावर बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. ताशी सुमारे १०० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या एर्टिगा कारने मागून अज्ञात ट्रकला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत तीन टेनिसपटूंचा मृत्यू झाला असून अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. बलदिराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९७.५०० मैलखुणेजवळ ही दुर्घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार, एर्टिगा कारमधून एकूण सहा जण लखनौहून देवरियाच्या दिशेने जात होते. बुधवारी पहाटे सुमारे ५ वाजता कार द्रुतगती मार्गावरून वेगाने जात असताना तिची ट्रकला मागून धडक बसली. प्राथमिक तपासात चालक किंवा कारमधील एका व्यक्तीला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यावेळी कारचा वेग ताशी जवळपास १०० किलोमीटर असल्याचे सांगण्यात आले.

ट्रकला बसलेली धडक एवढी तीव्र होती की एर्टिगाच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. कारमधील प्रवासी आत अडकून पडले. अपघाताची माहिती मिळताच यूपीडीएचे सुरक्षा कर्मचारी आणि स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. बचावकार्य सुरू करून वाहनात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेतून कुमारगंज येथील १०० खाटांच्या संयुक्त रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती गंभीर असलेल्या तिन्ही जखमींना पुढील उपचारासाठी दर्शन नगर वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. या दुर्घटनेत देवरिया येथील नित्या प्रजापती (२२), इरफान अन्सारी (२०) आणि अनिकेत (२४) यांचा मृत्यू झाला. तर देवरियातील लार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लखौरा येथील आनंद यादव (२३), तैयार बुझुर्ग येथील राजू यादव (२२) आणि पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील जमुनी येथील जयंतो शर्मा (३०) हे गंभीर जखमी झाले आहेत. तिघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघातातून बचावलेल्या जयंतो शर्मा यांनी दुर्घटनेचा थरारक अनुभव सांगितला. ते म्हणाले की, प्रवासादरम्यान सर्वजण झोपले होते. अचानक झालेल्या जोरदार धडकेने त्यांना जाग आली. त्यावेळी कार ट्रकला धडकल्याचे दिसले आणि त्यांचे साथीदार रक्तबंबाळ अवस्थेत होते. अपघातानंतर वाटसरूंनी कारचा दरवाजा तोडून प्रवाशांना बाहेर काढल्याचेही त्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. अपघातानंतर ट्रक घटनास्थळावरून निघून गेल्याने संबंधित अज्ञात वाहनाचा शोध घेण्यात येत आहे. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. बलदिराईचे सर्कल ऑफिसर आशुतोष कुमार यांनी या प्रकरणाची माहिती दिली असून, अपघातासंदर्भात आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.