वाशीम,
atmaram-bondre सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, अशा काळात ग्रामपंचायतींचे प्रशासक म्हणून काम करणार्या अधिकारी व कर्मचार्यांची जबाबदारी अधिक वाढली आहे. प्रशासक म्हणून काम करताना अनेक आव्हाने असली तरी त्याचबरोबर समाजासाठी चांगले काम करण्याची ही मोठी संधी आहे. त्यामुळे सर्वांनी हे आव्हान स्वीकारून या संधीचे सोनं करावे, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे यांनी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांच्या निर्देशानुसार सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या वतीने वसंतराव नाईक सभागृहात ६ ऑटोबर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ग्राम पंचायतचे प्रशासक म्हणून पदभार स्वीकारलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना या कार्यशाळेला आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी बोंद्रे यांनी वरील उद्गार काढले.
पुढे बोलताना ते म्हणाले सध्या दुष्काळी परिस्थिती आहे आणि लोकांना दुष्काळ सुसह्य व्हावा यासाठी प्रशासकांनी प्रयत्न करावे. विनाकारण कोणाची कामे अडवू नये तसेच कोणतेही काम नियमात असेल तर ते करताना घाबरू नका. असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. आपण समाजाचे काहीतरी देणं लागतं या भावनेतून काम करण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे यांनी केले. कार्यशाळेत प्रशासक नियुक्ती-अधिकार व कर्तव्य या विषयावर विस्तार अधिकारी प्रमोद लोखंडे यांनी मार्गदर्शन केले. सहाय्यक गट विकास अधिकारी विजय खिल्लारे यांनी प्रशासक म्हणून प्रत्यक्ष काम करताना येणार्या अडचणी आणि ग्रामपंचायत अधिनियम याबद्दल सविस्तर माहिती दिली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान याबाबत प्रवीण प्रशिक्षक मोहन भुसारी यांनी सादरीकरण केले. घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ या विषयावर राम श्रृंगारे यांनी पावर पॉईट प्रझेंटेशनच्या आधारे मांडणी केली. प्रशिक्षक शामलाल बरेटिया यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील महत्त्वाच्या बाबींचा उलगडा केला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सहाय्यक गटविकास अधिकारी गजानन खुळे यांनी केले. क्षमता बांधणी तज्ञ प्रफुल्ल काळे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले आणि ग्रामपंचायत अधिकारी राम देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले. अधिक्षक अमोल कापसे, अर्चना इंगोले आणि अथर्व शेटे यांनी कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.