चंद्रपूर,
assault-caseसासुरवाडीत जावयाला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी पत्नी, सासू आणि चुलत सासूविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सिंदेवाही तालुक्यातील जुना विरव्हा येथे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
जुना विरव्हा येथील रहिवासी अक्षय भगवान मेश्राम यांचा सन 2020 मध्ये गावातीलच शितल मुकुंदा धारणे हिच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. त्यांना चार वर्षांची मुलगी आहे. मात्र, काही वर्षात पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद सुरू झाल्याने मागील पाच महिन्यांपासून शितल आपल्या मुलीसह जुना विरव्हा येथेच आईच्या घरी राहू लागली होती. दरम्यान मंगळवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास अक्षय मेश्राम हे आपल्या सासूच्या घरी गेले. यावेळी त्यांनी एमआयडीसी चंद्रपूर येथील भाड्याच्या खोलीत राहताना वापरत असलेले घरगुती सामान, भांडे, कुलर व गॅस सिलेंडर खोलीवर नसल्याबाबत पत्नीला विचारणा केली.
यावरून त्यांच्यात वाद झाला. यावेळी अक्षय यांची सासू विमला मुकुंदा धारणे आणि चुलत सासू विजया संदीप धारणे तिथे आल्या. तिन्ही महिलांनी मिळून त्यांना जबर मारहाण केली. यात जखमी झालेल्या अक्षय यांना उपचारासाठी सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी सिंदेवाही पोलिसांनी आरोपी पत्नी शितल मेश्राम, सासू विमला धारणे आणि चुलत सासू विजया धारणे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक लता वाढीवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सचिन डोंगरे करीत आहेत.