कळमना जंगलात रानडुकराची शिकार

मध्य प्रदेशातील चार संशयित ताब्यात

    दिनांक :07-Oct-2026
Total Views |
चंद्रपूर,
ballarshah-wild-boar-huntingबल्लारशाह वनपरिक्षेत्रातील कळमना उपक्षेत्राच्या संरक्षित वनखंड क्रमांक 572 मध्ये 11 केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनीचा वापर करून रानडुकराची शिकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिवंत वीजप्रवाह सोडून तयार करण्यात आलेल्या सापळ्यात अडकून रानडुकराचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी वनविभागाने मध्य प्रदेशातील चार संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
 
 
dddd
 
5 ऑक्टोबरच्या रात्री शिकारीसाठी 11 केव्ही विद्युत वाहिनीवरून जिवंत वीजप्रवाह घेण्यात आला. बांबूच्या खुट्यांच्या साहाय्याने विद्युत तार वनक्षेत्रात टाकून शिकारीचा सापळा तयार करण्यात आला होता. या सापळ्याच्या संपर्कात आल्याने रानडुकराला विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी हा प्रकार वनविभागाच्या निदर्शनास आला.
 
 
घटनेची माहिती मिळताच वनकर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर या प्रकरणात वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 मधील तपासादरम्यान रामभरोसे इंदलसिंग उईके, मिलाप मंगल भलावी, अनिल पुलसिंग मरकाम आणि नागेश बुद्धराम उईके (सर्व रा. उमरीया, ता. लामटा, जि. बालाघाट, मध्य प्रदेश) या चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले. हे चारही संशयित सध्या कळमना येथील बालाजी बांबू सप्लायर डेपो येथे वास्तव्यास असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.
 
 
 
वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी थेट उच्चदाब विद्युत वाहिनीचा वापर करण्यात आल्याने या घटनेची गंभीर दखल वनविभागाने घेतली आहे. या शिकारीमागे आणखी व्यक्तींचा सहभाग आहे का, तसेच परिसरात अशाच पद्धतीने वन्यप्राण्यांची शिकार केली जात होती का, याचा तपास करण्यात येत आहे. त्यामुळे चौकशीत शिकारीचे मोठे जाळे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ही कारवाई वनपरिक्षेत्राधिकारी राजेंद्र घोरुडे, क्षेत्रसहायक देवराव टेकाम, वनपाल डी. आर. चागलवार, वनरक्षक सुधीर बोकडे, अतुल मोहले, वैशाली जेणेकर, सविता गेडाम यांच्यासह वनकर्मचार्‍यांनी केली.