नवी दिल्ली,
bhuvneshwar-kumar रतीय क्रिकेट संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या टी-२० संघात अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे नाव पाहायला मिळाल्याने क्रिकेटविश्वात चर्चा रंगली आहे. तब्बल चार वर्षांनंतर त्याला पुन्हा भारतीय टी-२० संघात स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे, भुवनेश्वरने अखेरचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना न्यूझीलंडविरुद्धच खेळला होता.
भुवनेश्वर कुमारने २२ नोव्हेंबर २०२२ रोजी नेपियर येथे न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा टी-२० सामना खेळला होता. त्या सामन्यात त्याने चार षटके टाकताना ३५ धावा दिल्या होत्या. त्यानंतर त्याला भारतीय संघात पुनरागमनाची संधी मिळाली नाही. आता आगामी न्यूझीलंड दौऱ्यासाठी त्याची पुन्हा निवड करण्यात आली असून, त्याच्या अनुभवाचा संघाला फायदा होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, यावेळच्या संघनिवडीची प्रक्रियाही चर्चेचा विषय ठरली आहे. अजित आगरकर यांनी मुख्य निवडकर्ता पद सोडल्यानंतर प्रज्ञान ओझा यांची अंतरिम मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघाची निवड झाली. श्रेयस अय्यरकडे संघाचे नेतृत्व कायम ठेवण्यात आले आहे.
भुवनेश्वर कुमारच्या पुनरागमनामागे नेमके कारण काय आहे, याबाबत बीसीसीआयकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, गेल्या काही काळात संघात युवा खेळाडूंना अधिक संधी देण्यावर भर देण्यात आला होता. त्यामुळे अनुभवी भुवनेश्वरला सातत्याने संघाबाहेर राहावे लागले. आता निवड समितीत झालेल्या बदलानंतर त्याला पुन्हा संधी मिळाली आहे.
काही वृत्तांनुसार, माजी भारतीय वेगवान गोलंदाज आर.पी. सिंग हे भुवनेश्वरच्या पुनरागमनासाठी आग्रही होते. दोघेही उत्तर प्रदेशशी संबंधित असून, भुवनेश्वरला पुन्हा भारतीय संघात स्थान मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. मात्र, यासंदर्भात बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन, तिलक वर्मा, अक्षर पटेल, शिवम दुबे, नितीश रेड्डी, नमन धीर, प्रिन्स यादव, मयंक यादव, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. आता चार वर्षांनंतर मिळालेल्या संधीचे भुवनेश्वर कसे सोने करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.