देवळी,
deoli-fridge-blast-fireशहरातील नगरपरिषद लेआउट मधील पांडुरंग जगोबाची लेंडे यांच्या घरी दुसर्या माळ्यावर किरायाने राहणारे सचिन भास्कर वैद्य यांच्या घरातील फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. यावेळी घरात कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला.
सचिन वैद्य हे पांडुरंग लेंडे यांच्या घरी किरायाच्या खोलीत राहतात. आज दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान अचानक त्यांच्या घरचा फ्रीजचा कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने आग लागली. घरातून धुराचे लोळ उठत असल्याचे घरमालक लेंडे यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ नगरपरिषद देवळीच्या अग्निशामक दलाला पाचारण केले. आगीचे वृत्त समजतात अग्निशमक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पण, घराला कुलूप असल्याने घरमालकाने कुलूप तोडून लागलेली आग विझविण्यात आली. फ्रीजचे कॉम्प्रेसरचा स्फोट ज्या ठिकाणी झाला त्याच ठिकाणी दोन सिलेंडर ठेवले होते. आग चारही दिशेने पसरली असताना अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या शिताफिने सिलिंडर बाहेर काढून फेकले. त्यामुळे सिलिंडरचा स्फोट होण्यापासून वाचविता आले.
या आगीत घरातील गृहोपयोगी कपाट, गाद्या, दिवाण, दरवाजे, पंखे, कपडे यासह इतरही साहित्य जळून खाक झाले. तसेच कपाटातील सोने सुद्धा जळाल्याचे सांगण्यात आले. या आगीत जवळपास ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सचिन वैद्य यांनी सांगितले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक विभागाचे कर्मचारी अभिषेक काळे, अकिल फारुखी, आसिफ शेख, अक्षय क्षीरसागर यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या तत्परतेमुळे आग अधिक पसरण्यापासून रोखण्यात यश आले.