अशोकजी-मोरोपंतजींचे स्वप्न साकार-डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

देवलापार गो-विज्ञान केंद्रात पाच प्रकल्पांचे लोकार्पण

    दिनांक :07-Oct-2026
Total Views |
नागपूर,
devalapar-govigyan-new-projects श्रद्धेय अशोकजी सिंघल यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या शुभारंभानिमित्त देवलापार येथील गो-विज्ञान अनुसंधान केंद्र, गोतीर्थ येथे पाच नवीन प्रकल्पांचे लोकार्पण आणि दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पांची घोषणा करण्यात आली. परमपूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. गोसेवा, गोसंवर्धन, ग्रामीण अर्थव्यवस्था, जैविक शेती आणि रोजगारनिर्मितीला विज्ञानाची जोड देण्याच्या दिशेने हा सोहळा महत्त्वाचा टप्पा ठरला.
 
gividhyan
 
या कार्यक्रमात आर.सी. प्लास्टोच्या सीएसआर सहकार्याने उभारलेल्या ऑर्गेनिक मॅन्युअर युनिटचे, देशी गोवंशाच्या नस्ल सुधारणा व संवर्धनासाठीच्या आयव्हीएफ युनिटचे, रामदेवबाबा युनिव्हर्सिटी, नागपूरच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या बैलचलित विद्युतनिर्मिती युनिटचे तसेच ग्रामीण रोजगाराला चालना देणाऱ्या राणी दुर्गावती ग्रामीण हाटचे लोकार्पण करण्यात आले. याशिवाय पंचगव्य कॅन्सर वेलनेस सेंटर आणि गोविद्यापीठ या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा करण्यात आली.
 
 
‘संकल्प केला तर परिवर्तन घडते’
परमपूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आपल्या संबोधनातून अशोकजी सिंघल आणि मोरोपंत पिंगळे यांच्या कार्याचे स्मरण केले. मोरोपंतजी आणि अशोकजींच्या स्मृती कायम ठेवण्यासाठी समाज योगदान देत आहे आणि देवलापारमधील प्रकल्प त्याचे उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताच्या लोकांनी आपल्या परंपरेनुसार पुरुषार्थ केला पाहिजे. धर्माची स्थापना आणि अधर्माचा नाश झाला पाहिजे, असे सांगताना डॉ. भागवत यांनी अशोकजी आणि मोरोपंतजींच्या कार्याची आठवण करून दिली. त्यांनी कार्याला सुरुवात केली तेव्हा ते आजच्याइतके प्रसिद्ध नव्हते. मात्र आपल्या शक्तीनुसार राष्ट्रासाठी कार्य करण्याचा त्यांनी संकल्प केला आणि त्यासाठी आपले जीवन समर्पित केले.
राममंदिर आंदोलनाचा संदर्भ देताना डॉ. भागवत यांनी अशोकजींच्या निष्ठेचे स्मरण केले. राममंदिरासाठी मोक्षाचाही त्याग करावा लागला तरी आपण तयार आहोत, अशी भावना अशोकजींनी व्यक्त केली होती. अशोकजी आणि मोरोपंतजींनी स्वतःला राष्ट्रकार्यात विसर्जित केले. त्यांनी जे घडवून आणण्याचा संकल्प केला होता, ते आज प्रत्यक्षात येत असल्याचे डॉ. भागवत यांनी नमूद केले.
गोसेवा केवळ भावनेपुरती मर्यादित न ठेवता गोवंशाला शेती, ऊर्जा, जैविक खत आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी जोडण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. गो-विज्ञान अनुसंधान केंद्राने परंपरा आणि विज्ञानाचा समन्वय साधत उभे केलेले प्रकल्प समाजासाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
‘अशोकजींनी हिंदू समाजाला शौर्य दिले’
विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी अशोकजी सिंघल यांच्या कार्याचा गौरव करताना हिंदू समाजाला शौर्य आणि विजयभाव देणे ही त्यांची मोठी उपलब्धी असल्याचे सांगितले.
मोरोपंत पिंगळे हे महान तपस्वी होते. आज संपूर्ण देश अशोकजींची जन्मशताब्दी साजरी करीत आहे. देवलापार येथे उभे राहणारे गोसेवा प्रकल्प हे संकल्प, पुरुषार्थ आणि सेवाभावाचे उदाहरण आहेत.
गोसेवेच्या माध्यमातून ग्रामीण भागात आर्थिक स्वावलंबन निर्माण करण्याची क्षमता असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. गोवंशाचे संरक्षण केवळ आश्रय देऊन नव्हे, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेत त्याचा उपयोग वाढवून करण्याची आवश्यकता असल्याचे या प्रकल्पांतून अधोरेखित होत आहे.
गो-विज्ञान अनुसंधान केंद्राचे अध्यक्ष पदमेश गुप्ता यांनी केंद्राच्या गेल्या ३० वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. गोसेवा, गोरक्षा, गो-आधारित शेती आणि ग्रामविकासाला विज्ञानाची जोड देत केंद्राचे कार्य पुढे नेणे हीच श्रद्धेय अशोकजी सिंघल यांच्या विचारांना खरी आदरांजली असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
‘रामटेकसोबत देवलापारही पर्यटनाचे केंद्र बनेल’
राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी देवलापार गो-विज्ञान अनुसंधान केंद्राच्या आगामी विकासाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली. भविष्यात रामटेकला भेट देणाऱ्या पर्यटकांनी गो-विज्ञान अनुसंधान केंद्रालाही भेट द्यावी, यासाठी या परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
गोसेवा आयोगाच्या माध्यमातून गो-विज्ञान केंद्राला ‘गौ पर्यटन’चा दर्जा देण्यात आल्याचे जयस्वाल यांनी नमूद केले. त्यामुळे देवलापार परिसराला गोसेवा, संशोधन आणि ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून नवी ओळख मिळण्याची शक्यता आहे.सोबतच चारा उत्पादनाला चालना देण्यासाठी महिला बचत गटांना सहभागी करून घेण्याची घोषणा त्यांनी केली.
श्रद्धेय अशोकजी सिंघल यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभी झालेला हा कार्यक्रम त्यांच्या गोसेवा, गोरक्षा आणि राष्ट्रसेवेच्या विचारांना अभिवादन करणारा ठरला.
कार्यक्रमाला महसूलमंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विहिंपचे केंद्रीय अध्यक्ष आलोक कुमार, खासदार माया ईवनाते, ओमप्रकाश शेटे,
राज्यमंत्री आशिष जयस्वाल, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंधडा, हेमंत जांभेकरयांच्यासह मान्यवर उपस्थित होते.