वाशीम,
district-steering-committee-meeting जिल्ह्यातील प्रत्येक बालकाने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान आत्मसात करणे आवश्यक असून, ‘शून्य निपुण’ असलेल्या शाळांमध्ये विशेष लक्ष केंद्रित करून प्रभावी उपाययोजना कराव्यात. केंद्रप्रमुख व विस्तार अधिकार्यांनी अशा शाळा दत्तक घेऊन नियमित वर्ग निरीक्षण व मार्गदर्शन करावे. शून्य निपुण शाळांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,डायट, वाशीम आणि शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, वाशीम यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील काटेपूर्णा सभागृहात जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी ते बोलत होते. बैठकीला सुकाणू समितीचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान , तसेच सुकाणू समितीचे सचिव डायटचे प्राचार्य डॉ. राजेंद्र महाजन, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विठ्ठल भुसारे, डायट अधिव्याख्याता डॉ. राजेश गवई, शिवाजी साखरे, सय्यद, उपशिक्षणाधिकारी कृष्णा बिरादार, येनगुलवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
‘निपुण महाराष्ट्र’ अहवालानुसार, वाशीम जिल्ह्यातील ७९५ प्राथमिक शाळांमधील ४२ हजार ५४९ विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये जिल्ह्याची निपुण सरासरी १७.३ टक्के असून, ७ हजार ३६२ विद्यार्थी निपुण ठरले आहेत. जिल्ह्यातील २९१ शाळांमध्ये म्हणजेच ३६.६ टक्के शाळांमध्ये एकही विद्यार्थी निपुण नसल्याचे निदर्शनास आले. तालुकानिहाय कामगिरीमध्ये कारंजा लाड २६.६ टक्के आणि वाशीम २२.५ टक्के या तालुयांतील कामगिरी आघाडीवर आहे. मानोरा ८.८ टक्के आणि रिसोड १०.७ टक्के हे तालुके मागे आहेत. मानोरा तालुयातील तब्बल ५० टक्के शाळांमध्ये निपुणता शून्य असल्याचेही बैठकीत स्पष्ट झाले.
या पार्श्वभूमीवर २९१ ‘शून्य निपुण’ शाळांसाठी विशेष टास्क फोर्स कार्यरत करून गटशिक्षणाधिकार्यांचे थेट उत्तरदायित्व निश्चित करण्यात आले आहे. केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी या शाळा दत्तक घेऊन दर आठवड्याला प्रत्यक्ष वर्ग निरीक्षण व मार्गदर्शन करणार आहेत. तसेच इयत्ता दुसरी व तिसरीतील कमकुवत विद्यार्थ्यांसाठी दररोज एक तास विशेष उपचारात्मक वर्ग घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या वर्गांमध्ये अक्षरओळख, श्रुतलेखन आणि गणित पेटीतील साहित्याचा वापर करून विशेष सराव घेतला जाणार आहे. जिल्ह्याची निपुण सरासरी ५० टयांपेक्षा अधिक करण्याचे लक्ष्यही निश्चित करण्यात आले.
शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी शिक्षकांच्या सक्षमीकरणावरही भर देण्यात येत आहे. गुगल एज्युकेशन फाउंडेशनच्या सहकार्याने २४० शिक्षकांना संगणक व कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येत आहे. केंद्रस्तरावर १४८ ‘आयडॉल शिक्षकांची’ बँक तयार करण्यात येत असून, दर शनिवारी ‘प्रेरणादायी शनिवार’ या उपक्रमांतर्गत युट्यूब द्वारे मार्गदर्शन सत्रे घेतली जात आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक बालकाला पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करून देण्यासाठी शाळानिहाय प्रगतीचे सातत्याने निरीक्षण, प्रभावी अध्यापन पद्धतींची देवाणघेवाण, शिक्षकांचे सक्षमीकरण आणि गरजेनुसार उपचारात्मक अध्यापन यावर विशेष भर देण्यात येत आहे.माहितीचे सादरीकरण डॉ.महाजन यांनी केले. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, सुकाणू समिती सदस्य, निवडक केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी, यांसह तज्ञ शिक्षक विश्वंभर आळणे उपस्थित होते.