पत्नीसोबत घटस्फोटाच्या वादातून चाकूहल्ला

सात जणांविरुद्ध गुन्हा; दोघे जखमी

    दिनांक :07-Oct-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
divorce dispute घटस्फोटाच्या प्रक्रियेवरून सुरू असलेल्या कौटुंबिक वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन दोघांवर चाकूने हल्ला करण्यात आला. ही घटना सोमवारी सायंकाळी सदर परिसरात घडली. या प्रकरणी सदर पोलिसांनी महिला आणि तिच्या कुटुंबीयांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 

divorce dispute turns violent as wife and relatives attack two men with knife in nagpur 
सुमन कैलास पुसाटे (५०) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या भाच्याचा पत्नीशी कौटुंबिक वाद सुरू आहे. परस्पर संमतीने घटस्फोटाची कागदपत्रे तयार करण्यासाठी दोन्ही कुटुंबीय जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जमले होते. विवाहावेळी देवाणघेवाण झालेले दागिने व अन्य वस्तू परत करून वाद सामोपचाराने मिटविण्याचे ठरले होते. मात्र, चर्चा सुरू असताना भाच्याच्या पत्नीने कथितरीत्या वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी पुसाटे आणि त्यांच्या बहिणीने विरोध केला. त्यावर आरोपी मयूर भगत (४०) याने रवींद्र भाऊराव लोखारे (६०) यांच्या डोक्यावर चाकूने वार केल्याचा आरोप आहे. रवींद्र यांना वाचविण्यासाठी त्यांचे नातेवाईक रंगनाथ भाऊराव लोखारे (४४) मध्ये पडले. त्यावेळी भगत याने रंगनाथ यांच्या पोटावर चाकूने वार करून गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर अन्य आरोपींनीही दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. हल्ल्यात divorce dispute  जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र पोलिस कायद्यातील संबंधित कलमांनुसार सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये मयूर भगत, त्याची पत्नी, धाकटा भाऊ, अमरावती येथील एक महिला, तिचे वडील आणि अन्य दोन पुरुष नातेवाईकांचा समावेश आहे. घटनेमागील नेमके कारण आणि प्रत्येक आरोपीची भूमिका याबाबत सदर पोलिसांकडून तपास सुरू आहे.