मुंबई
kiara advani अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा एकदा आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या सेलिब्रिटी दाम्पत्याच्या दुसऱ्या बाळाबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. अखेर दोघांनीही खास पोस्टद्वारे या चर्चेला दुजोरा दिला असून, आपल्या कुटुंबात लवकरच नव्या सदस्याचे आगमन होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
कियारा आणि सिद्धार्थ यांनी सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला आहे. या छायाचित्रात दोघांनी एकमेकांच्या हातावर हात ठेवला असून, त्यांची मुलगी सरायानेही त्यावर आपला हात ठेवला आहे. विशेष म्हणजे, तिघांच्या हातांवर चिमुकल्या बाळाचे लहान पायमोजे ठेवण्यात आले आहेत. या फोटोच्या माध्यमातून दाम्पत्याने आपल्या चाहत्यांना कुटुंबात नव्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याची गोड बातमी दिली.
हा फोटो शेअर करत कियारा आणि सिद्धार्थ यांनी, “पुन्हा एकदा या सुंदर गिफ्टच्या रूपाने आम्हाला आशीर्वाद मिळाला आहे. आमचं हृदय प्रेम आणि कृतज्ञतेने भरून गेलं आहे,” अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
पोस्ट सोशल मीडियावर प्रसिद्ध होताच चाहत्यांनी या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. कमेंट्स आणि लाईक्सच्या माध्यमातून चाहत्यांसह सेलिब्रिटी विश्वातूनही या आनंदाच्या बातमीचे स्वागत केले जात आहे.
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा जुलै २०२५ मध्ये पहिल्यांदा आई-बाबा झाले. त्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला असून त्यांनी तिचे नाव सराया ठेवले आहे. आता मुलीच्या जन्मानंतर जवळपास दीड वर्षांनी दोघांनी पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांसोबत कुटुंबात नव्या सदस्याच्या आगमनाची आनंदाची बातमी शेअर केली आहे.