मंगरूळनाथ,
special-devi-darshan-package-tour शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी जाणार्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभागाअंतर्गत येणार्या मंगरूळनाथ आगाराच्या वतीने विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदा नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून मंगरूळनाथ आगाराकडून ‘विशेष माहूर देवी दर्शन पॅकेज टूर’ चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे वाशीम जिल्ह्यातील भाविकांना सुरक्षित आणि आरामदायी वातावरणात प्रमुख देवी मंदिरांचे दर्शन घेता येणार आहे. नरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर आगाराच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष पॅकेज टूर अंतर्गत भाविकांना माहूर (रेणुका माता), पोहरादेवी, पातूर, रेणुका देवी, काटेपूर्णा, ढगादेवी, अमरावती (अंबादेवी) आदि पवित्र देवी मंदिरांचे आणि धार्मिक स्थळांचे दर्शन घेता येणार आहे.

भाविकांचा प्रवास सुखकर व विनासायास व्हावा यासाठी एस.टी. महामंडळाने विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रशस्त व वातानुकूलित बस सेवा, पुश बॅक सीटची सोय, स्वच्छ व निर्जंतुक केलेली बस, प्रत्येक प्रवाशासाठी सुरक्षित प्रवासाची हमी, तसेच ’अमृत ज्येष्ठ नागरिकां’साठी मोफत प्रवासाची सोय केली असून, महिलांसाठी स्वतंत्र बस व्यवस्था करण्यात आली आहे. महामंडळाने प्रवाशांना प्रवासादरम्यान स्वच्छता राखण्याचे आणि कचरा बसमध्ये न टाकण्याचे आवाहन केले आहे. तसेच चालक व कर्मचार्यांच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित प्रवासाला सहकार्य करण्याचे सांगण्यात आले आहे.
या विशेष बस सेवेचा लाभ घेण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी मंगरूळनाथ आगार कार्यालयाशी, तसेच आगार व्यवस्थापक संदीप पवार, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक नितिन तायडे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक राठोड आणि वाहतूक निरीक्षक दिपक विटकरे यांच्याशी संपर्क साधून माहिती घेता येणार आहे.