मुंबई
bogus doctors मुंबई क्राइम ब्रँचच्या कारवाईत शहरातील सात क्लिनिकमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भांडुप, मानखुर्द, कुर्ला, जोगेश्वरी, बोरीवली आणि दहिसर परिसरात सक्रिय असलेल्या बोगस डॉक्टरांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान एकूण १० जण कोणतीही वैध वैद्यकीय पदवी किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी नसतानाही डॉक्टर म्हणून रुग्णांवर उपचार करत असल्याचे आढळून आले.
क्राइम ब्रँच युनिट-७ला या परिसरात बोगस डॉक्टर कार्यरत असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने वेगवेगळ्या दिवशी सात क्लिनिकवर छापे टाकले. यामध्ये भांडुप येथील संतोष हेल्थ क्लिनिक आणि विनायक हेल्थ क्लिनिक, जोगेश्वरीतील हमदम दवाखाना आणि कोहिनूर दवाखाना, बोरीवलीतील अंकुश आयुर्वेदिक दवाखाना, दहिसरमधील दीपक हर्बल हेल्थ केअर क्लिनिक आणि मानखुर्दमधील समर आयुर्वेदिक दवाखान्याचा समावेश आहे. मानखुर्द येथील क्लिनिकवर क्राइम ब्रँच युनिट-६ने कारवाई केली.
क्राइम ब्रँचचे डीसीपी नवनाथ ढवळे यांच्या माहितीनुसार, संबंधितांकडे वैद्यकीय क्षेत्रातील आवश्यक पदवी नसतानाही तसेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी नसतानाही ते स्वतःला डॉक्टर म्हणून सांगत रुग्णांवर उपचार करत होते. गुप्तरोगासह विविध आजारांवर उपचार करण्याच्या नावाखाली रुग्णांना अॅलोपॅथिक, आयुर्वेदिक आणि युनानी औषधे देऊन त्यांच्याकडून मोठी फी आकारली जात असल्याचे तपासात समोर आले.
या कारवाईदरम्यान एका bogus doctors बोगस डॉक्टरला स्वतः एचआयव्हीची लागण झाल्याची माहितीही तपासात समोर आली. पोलिसांनी केलेल्या तपासणीत काही क्लिनिकमध्ये मुदत संपलेली युनानी आणि आयुर्वेदिक औषधे विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचेही आढळले.
सातही क्लिनिकमधून पोलिसांनी विविध प्रकारची औषधे, औषधांच्या बाटल्या, सिरिंज, अँटिबायोटिक गोळ्या तसेच अन्य वैद्यकीय साहित्य असा सुमारे दोन लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सर्व बोगस डॉक्टरांविरुद्ध महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट, १९६१ मधील कलम ३३ आणि ३६ अंतर्गत भांडुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास क्राइम ब्रँच युनिट-७, घाटकोपरकडून सुरू आहे.