आपटी शिवारातील घटना
पुलगाव,
murder-committed-by-beating-with-an-iron-pipe स्वत:चे लग्न झाले असतानाही दुसर्या महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवणार्यास दोघांनी लोखंडी पाईपने मारहाण करून जीवानिशी ठार केले. ही घटना ७ रोजी सकाळी ८ ते ९ वाजताच्या सुमारास नजीकच्या आपटी परिसरात घडली. नागसेन मारोतराव भगत (४५) रा. आपटी असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
आपटी येथील रहिवासी नागसेन भगत याचे पतीपासून विभक्त झालेल्या एका महिलेशी अनैतिक संबंध होते. याच कारणावरून नागसेनला आपटी येथीलच रहिवासी गिरीश कोल्हे (४८) व अविनाश कोल्हे (४३) यांनी समज दिली होती. पण, नागसेन याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही. अशातच ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते ९ वाजताच्या सुमारास पुलगाव-आपटी मार्गावरील हनुमान मंदिराजवळ गिरीश व अविनाश यांनी नागसेन याच्याशी वाद करून त्याला लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. यात नागसेन गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरिकांच्या मदतीने तातडीने पुलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने सावंगी मेघे येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान नागसेन याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पुलगाव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. वंदना कारखेले यांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाची पाहणी केली. तर घटनास्थळी पोहोचलेल्या फॉरेन्सीकच्या चमूने घटनास्थळावरून रक्तमिश्रीत माती, साधी माती व इतर नमुने घेत ते विश्लेषणासाठी पाठविले. घटना घडल्यानंतर पुलगाव पोलिस अॅक्शन मोडवर आले. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींचा अवघ्या काही तासांतच शोध घेत त्यांना अटक केली. ही कामगिरी सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन मदनकर, विनोद राघाटाटे, संदीप बोरबन, सोमित गनथाडे, अजय अनंतवार, अमोल बरडे यांनी केली.