नागपूर,
nagpur-it-park-cleanliness-driveआयटी पार्क परिसरातील अस्वच्छता, कचरा साचणे तसेच अनधिकृत अतिक्रमणासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची नागपूर महानगरपालिकेने गंभीर दखल घेतली आहे. नागरिक, कर्मचारी तसेच परिसरातील व्यावसायिकांना कोणताही त्रास होऊ नये आणि परिसर स्वच्छ व सुरक्षित राहावा, यासाठी संबंधित विभागामार्फत तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे.
आयटी पार्कमधील शिवलकर बिल्डिंग परिसर, आयटी पार्क बस स्टॉप ते विजय नगर चौक, आयटी पार्क मुख्य रस्ता तसेच संभाजी चौक ते पर्सिस्टंट कंपनीपर्यंतच्या मार्गावर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. रस्त्याच्या कडेला व परिसरात साचलेला कचरा हटविणे, आवश्यक ठिकाणी स्वच्छता करणे तसेच अनधिकृतपणे ठेवण्यात आलेले साहित्य व अडथळे दूर करण्याबाबत संबंधित यंत्रणेला निर्देश देण्यात आले आहेत.
आयटी पार्क हा शहरातील महत्त्वाचा माहिती-तंत्रज्ञान व व्यावसायिक परिसर असून, येथे दररोज मोठ्या संख्येने कर्मचारी, नागरिक व व्यावसायिक ये-जा करतात. त्यामुळे परिसरातील स्वच्छता, वाहतूक सुरळीत राहणे आणि पादचारी तसेच महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला महापालिकेचे प्राधान्य आहे.
परिसरातील कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी नियमित स्वच्छता आणि निरीक्षण वाढविण्यात येत असून, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच रस्ते व पदपथांवर अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणांबाबत संबंधित विभागामार्फत पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही केली जात आहे.
नागरिकांनी व परिसरातील व्यावसायिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, तसेच स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.